नवी दिल्ली : राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतो आहे. दरम्यान २ वर्षानंतर जल्लोषात यावर्षी गुढीपाडवा साजरा केला जात आहे, त्यामुळे आजचा दिवस आणखी खास आहे. आज एकमेकांना नव वर्षाच्या शुभेच्छा देत अनेकजण हा सण साजरा करत आहेत. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट करत या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो.
आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. pic.twitter.com/E0ocwJ3czA
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2022
ट्वीटरद्वारे संदेशात पंतप्रधान म्हणाले, ” गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केली आहे. ट्विटर युजर्सनी त्यांनाही आजच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरं केलं जातं. काही भागात आजपासून नवरात्र उत्सव देखील साजरा केला जातो. मोदींनी याबाबत देखील सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात शोभायात्रा निघू शकल्या नाहीत. आता कोविड १९ संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारनेही सर्व निर्बंध हटवलेत. त्यामुळे दोन वर्षांनंतर मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील गिरगाव, दादर, डोंबिवलीमध्ये शोभायात्रा निघत आहेत. या शोभायात्रांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. महिला बाईकस्वार, ध्वज, लेझिम पथक, ढोल-ताशा, रणमैदानी खेळांची प्रत्याक्षिकं इ. सर्व गोष्टी च्या नागरिकांना गेली दोन वर्ष अनुभवता आल्या नव्हत्या त्या करताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो आहे.