रावसाहेब दावेंचा शरद पवारांना खोचक टोला
जालना : महाराष्ट्र राज्यातील गृहखातेच नाहीतर राज्य सरकारच संशयाच्या घेऱ्यात अडकल्याची टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर केली आहे. ते आज जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सबळ पुरावे देऊनही पोलीस भाजपच्या नेत्यांवर कारवाई करत नसल्याने गृहखाते शिवसेनेकडे देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यावर बोलताना गृहखाते काय भाजपच्या नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी तयार केले आहे का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.
लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दामहून उपद्व्याप
राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत आहे. मात्र, राज्यात विकासाची घडी विस्कटल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी मुद्दामहून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असा उपद्व्याप करत असल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.
‘६ खासदारांवर कुणीही पंतप्रधान होत नाही’
शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे यासाठी राष्ट्रवादीने अनेकवेळा ठराव घेतले. शरद पवार चांगले नेते आहेत. मात्र, युती असेल तर ६ जागा आणि युती नसेल तर ४ जागा त्यांच्या पक्षाला मिळतात. ६ खासदारांवर कुणीही पंतप्रधान होत नाही हे शरद पवारांना देखील माहित आहे. तरीही त्यांच्या पक्षाने ठराव घेतला याबाबत अधिक न बोललेलं बरं असं सांगत दानवे यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.
उत्तर प्रदेश आमच्या ताब्यात आल्याची सल
जयंत पाटील यांनी काल उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेश म्हणजे भारत नव्हे असा टोला भाजपला लगावला होता. यावर देखील दानवे यांनी भाष्य केले. देशाच्या पंतप्रधानाचा रस्ता हा उत्तर प्रदेशातून जातो, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच नेते म्हणतात. आता भाजपची सत्ता तिथे आल्याने ही २०२४ च्या निवडणुकीची नांदी असून आज उत्तर प्रदेश आमच्या ताब्यात आल्याने उत्तर प्रदेश म्हणजे देश नाही असं त्यांना वाटत असल्याची टीका दानवे यांनी केली.