मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई मेट्रो २ए आणि मेट्रो-७ या दोन मार्गिकांचे शनिवारी उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, अनिल परब तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनासाठीची मेट्रो फुलांनी सजवण्यात आली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी तिकीट काढून आरे कॉलनी ते कुरार स्थानक असा प्रवास केला. या मेट्रोचे उद्घाटन झालेले असले, तरी ही मेट्रोसेवा सर्वसामान्यांसाठी रविवारपासून (३ एप्रिल) धावणार आहे.
मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरता सुरू झाले आहेत. सात वर्षांपूर्वी जुन २०१४ ला मेट्रोचा पहिला मार्ग घाटकोपर ते वर्सोवा हा प्रवासी वाहतुकीकरता सुरु झाला होता. त्यानंतर मुंबईत एकुण पाच मेट्रो मार्गांची कामं टप्प्याटप्प्याने सुरू झाली. यापैकी दोन मेट्रो मार्गावरील काही भागात प्रवासी वाहतुक अखेर सुरू झाली आहे. ‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो २ अ’हा मार्ग २० किलोमीटर इतका आहे.
मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ या दोन्ही मार्गांचे भूमिपुजन हे ऑक्टोबर २०१५ मध्ये झाले होते. २०१६ मध्ये या दोन्ही मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. २०२१ पर्यंत हे काम पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या मेट्रो मार्गाच्या कामावर परिणाम झाला. अखेर विविध अडथळे पार होत काही महिन्यांपूर्वी या मेट्रो मार्गावर प्रत्यक्ष मेट्रोच्या चाचण्यांना सुरुवात झाली आणि अखेर आज या दोन्ही मार्गावरील काही टप्पे हे प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होत आहेत.
मेट्रो २ अ हा मार्ग डीएन नगर ते दहिसर पश्चिम असा एकूण १८.५ किलोमीटर लांबीचा, प्रामुख्याने पश्चिम उपनगरातील लिंक रोडला समांतर जात असून या मार्गावर एकूण १७ मेट्रो स्थानके आहेत. तर मेट्रो ७ हा अंधेरी ते दहिसर पूर्व असा पश्चिम द्रुतगती मार्गावरुन जाणारा १६.६ किलोमीटरचा मार्ग असून यावर एकुण १३ मेट्रो स्थानके आहेत. हे दोन्ही मार्ग दहिसर भागात एकमेकांना जोडले गेले आहेत . या दोन्ही मार्गांवरील दहिसरच्या दिशेकडचा काही भाग हा प्रवासी वाहतुकीकरता खुला होणार आहे.
२०२२ वर्ष संपायच्या आत हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे हे दोन्ही मेट्रोचे मार्ग पुर्णपणे वाहतुकीकरता सुरु झालेले असतील. या दोन्ही मेट्रो मार्गांमुळे पश्चिम उपनगरातील लाखो लोकांना प्रवासी वाहतुकीचा एक नवा आणि जलद असा पर्याय उपलब्ध होणार आहे.
कमीत कमी १० रुपये तिकिट दर; ११ मिनिटांच्या फरकाने मेट्रो
या नव्या मार्गावर कमीत कमी १० रुपये तिकिट दर असेल. तसेच ११ मिनिटांच्या फरकाने मेट्रो सुटेल. आरे कॉलनी आणि डहाणूकर स्थानक या दरम्यान मेट्रोच्या दररोज १५० फेऱ्या असणार आहेत. डहाणूकरवाडी या स्थानकाहून पहिली ट्रेन सकाळी ६ वाजता सुटेल. तर आरेहून पहिली ट्रेन सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. तसेच, शेवटची ट्रेन ही रात्री ९ वाजता सुटेल. आरेहून शेवटची मेट्रो रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल.
बेस्टचे नवीन बसमार्ग
नव्या मेट्रोमार्गावरील प्रवाशांना घरी आणि कामावर वेळेत जाता यावे यासाठी बेस्टने नवीन दोन बस मार्ग सुरू केले आहेत. मेट्रो २ ए साठी कांदिवली पश्चिम ते बंदर पाखाडी तसेच आरे मेट्रो स्थानक ते शिवशाही प्रकल्प असे दोन नवीन बसमार्ग आहेत. कांदिवली स्थानक पश्चिम ते बंदर पाखाडी गाव या दरम्यान नवीन बसमार्ग २७४ करण्यात येणार आहे. ही बस मेट्रो २ ए च्या डहाणूकरवाडी स्थानकामार्गे जाईल. या बस कांदिवली स्थानक (पश्चिम), देना बँक – काळा मारुती मंदिर, महात्मा गांधी तरण तलाव, कांदिवली गाव, डहाणूकरवाडी मेट्रो स्थानक, कामराज नगर, नेताजी नगर पब्लिक स्कुल मार्गे बंदरपाखाडी गाव अशी जाईल. कांदिवली स्थानकातून पहिली बस ६ वाजता सुटणार आहे. शेवटची बस रात्री ९.४५ वाजता सुटेल. तर बंदर पाखाडीहून पहिली बस सकाळी ६.१५ वाजता सुटणार आहे. तर शेवटची बस रात्री १० वाजता सुटेल.
मेट्रो ७ वरील आरे मेट्रो स्थानक ते शिवशाही प्रकल्प दरम्यान नवीन वातानुकूलित बसमार्ग ए ६४७ सुरू करण्यात येणार आहे. या बसमार्गावरील बस आरे मेट्रो स्थानक, विरवानी, दिंडोशी आगार, गोकुळधाम, वाघेश्वरी मंदिर, सामना परिवार, नागरी निवारा परिषद अशी धावणार आहे. आरे मेट्रो स्थानकातून पहिली बस ६.२० वाजता सुटणार असून शेवटची बस रात्री १० वाजता सुटणार आहे. शिवशाही पार्क, मंत्री पार्क येथून पहिली बस सकाळी ६ वाजता सुटणार आहे. शेवटची बस रात्री ९. ४० वाजता सुटेल.