नम्रता ढोले-कडू
आनंदाचे आणि हर्षोल्हासाचे प्रतीक म्हणून गणला जाणारा आपला हिंदू संस्कृतीचा वर्षातील पहिला सण म्हणजे ‘गुढीपाडवा’! हिंदू कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. चैत्र शुद्ध पक्षाच्या प्रथम दिवशी वसंत ऋतूचेही आगमन झाल्याने सर्व सृष्टीदेखील चैत्र पालवीचा साजशृंगार करून नववधूप्रमाणे नटलेली असते. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून या सणाला आपल्या हिंदू धर्मात खूप मोठा मान आहे. अभ्यंगस्नान करून पहाटेच सूर्योदय होण्यापूर्वी गुढी उभारावी असा प्रघात आहे. चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेच्या गाठ्या, कडुनिंबाची कोवळी पाने, मखमली कोरे खणाचे कापड यांच्यासमवेत गडू काठीवर बांधला जातो आणि अशीच सजवलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येकाच्या घरावर डौलाने उभी असते. विजयाचे प्रतीक म्हणून आपल्या संस्कृतीत गुढी उभारण्याची परंपरा आहे. प्रभू रामचंद्र सपत्नीक आणि आपल्या सेनेसह आपला वनवास संपवून, रावणावर अतुलनीय असा विजय मिळवून अयोध्येत परत आले होते. या आनंदाप्रीत्यर्थ अयोध्या नगरी सोन्या-माणकांसारख्या वैभवसंपन्न रत्नांनी सजली होती आणि रयतेने गुढ्या उभारून आपल्या राजाचे स्वागत केले होते. अशी वर्णने पुराणात वाचायला मिळतात. या दिवसापासून रामजन्माचा उत्सव देखील सुरू होतो. रामाचे नवरात्र पाडव्याच्या दिवशी सुरू होते आणि रामजन्माचा उत्सवाने त्याची सांगता होते. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने त्यावेळचे त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या शकांचा पराभव केला तोही याच दिवशी. त्याने सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यांत प्राण फुंकून हा विजय मिळवला, अशी आख्यायिका आहे. अगदीच शब्दशः अर्थ न घेता कदाचित त्या काळातील मृतवत, थंड गोळ्याप्रमाणे पडलेल्या समाजातील युवकांना त्याने जागृत करून हा विजय मिळवला असण्याची शक्यता आहे.
याच शालिवाहन राजाच्या नावावरून शालिवाहन शके ही त्या काळातील नवी कालगणना अस्तित्वात आली. गुढी या शब्दाचा अर्थ आपण बघितला तर, तेलुगू भाषेत लाकूड अथवा काठी किंवा तोरण असा आहे. महाराष्ट्र शब्दकोशात या शब्दाचा अर्थ झोपडी किंवा खोपटी असा आहे. लाकूड या अर्थाने तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबूने बनवलेले घर हे शब्द पाहता महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक आहे, असे दिसून येते. शालिवाहन पूर्वकाळात महाराष्ट्रीयांच्या शब्दसंग्रहातून गुढी शब्दाचा लाकूड किंवा बांबू अशा पद्धतीने होणारा वापर मागे पडला. मध्ययुगात हा उत्सव राजा आणि त्याच्या अधिकाऱ्यांकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्ती हा उत्सव सामुदायिकरीत्या साजरा करीत असे. त्यानंतर घरोघरी हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली.
मराठी लिखित साहित्यामध्ये म्हाईंभटांच्या लीळाचरित्रात गुढी उभविली असा उल्लेख आढळतो. संत ज्ञानेश्वरांनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये ‘सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवी गुढी उभविली अनेगी. विजयाची सांगे गुढी’ असे उल्लेख केलेले आढळतात. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा या सर्वांच्या लेखनात गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा आपल्या अभंगात म्हणतात, ‘टाळी वाजवावी। गुढी उभारावी। वाट ही चालावी पंढरीची’।। संत एकनाथांच्या काव्यात असंख्य वेळा ‘गुढी’ हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. संत एकनाथ ‘रणांगणी, तिन्ही लोकी आणि वैकुंठी’ गुढी उभारण्याचाही उल्लेख करतात. शालिवाहन काळात आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीय सैन्याने तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे निर्णायक संदेश साधन म्हणून गुढीचा वापर केल्याचे काही संदर्भ आढळतात. गुढी म्हणजे कौल देणे. अशा अर्थाने गुढी उजवी देणे आणि गुढी डावी देणे असे उल्लेख, विनंती मान्य करणे वा अमान्य करणे अशा अर्थाने वापरल्याचे दिसून येते. विठ्ठलाची वारी असो अथवा रणांगण, जनसमूहातील एखादा चपळ माणूस पाहून त्याच्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे. तुकाराम गाथेतील अभंगात संत तुकाराम म्हणतात, ‘पुढे पाठविले गोविंद गोपाळा। देऊनी चपळा हाती गुढी।।’ सोळाव्या शतकातील विष्णुदास नामा यांच्या अभंगात गुढीचा उल्लेख रामाच्या अयोध्येस परत येण्याच्या प्रसंगाशी जोडून केला गेला आहे. लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर या गुढीपाडव्याच्या सणाचा संबंध लोकसंस्कृतीत सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडतात, कृषी संस्कृतीशी या सणाची नाळ जोडलेली आपल्याला पटवून देतात. गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालून, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे, असेही काही सामाजिक संकेत आढळतात. आधुनिक काळात गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या पारंपरिक पोशाखातील मिरवणुका, शोभायात्रा काढल्या जातात. वर्षारंभीच कटू आठवणींचा घास गिळून पुढे आयुष्यभर नाते संबंधातला गोडवा जपणारा असा हा पाडवा! सकाळी आई जबरदस्तीने कडुनिंबाची पाने प्रसाद म्हणून तोंडात घालते तेव्हा अखिल बच्चे कंपनीचे अगदी अजिबात नक्को गं असं म्हणत नाक, तोंड गोळा करून आईला विनवण्या करणं, हे चित्र आजही अनेक घरांमधून बघायला मिळतं. मग आपल्याला या कडुनिंबाच्या पानाचे महत्त्व, कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच यासोबत देण्याचा प्रघात, कडुनिंबाचे औषधी गुणधर्म यांची माहिती घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून मिळते आणि मुकाट्याने तो कडू घास घशाखाली उतरवावा लागतो. या दिवशी लहान मुलांना इळवणी म्हणजे सूर्याच्या उन्हात तापलेल्या, कडुनिंबाची पाने घातलेल्या पाण्याने आंघोळ घातली जाते.
दुपारी गोडधोड पदार्थ जेवणात करून त्याचा नैवेद्य देखील गुढीला दाखविण्यात येतो. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरवतात त्यावेळी धणे-गुळाचा नैवेद्य गुढीला दाखवला जातो. त्यावरची साखरेची गाठी ‘गट्टम् स्वाहा ‘करण्यासाठी मुलांची चढाओढ सुरू होते. या दिवशी नव्या वास्तूची, वाहनांची व अन्य वस्तूंची खरेदी करण्याचा मुहूर्त साधला जातो. एखादा नवा उपक्रम राबवण्यासाठी देखील हीच सुवर्णसंधी असल्याचे मानले जाते. पाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरातील लहान थोरांनी नटून-थटून परस्परांना शुभेच्छा देणे आणि आनंद वाटून घेऊन तो द्विगुणित करणे हीच आपली संस्कृती आहे. आपण केवळ पारंपरिक गुढी उभारण्यापेक्षा काही नवसंकल्पांची गुढी उभारायला हवी आहे. मुलांना योग्य संस्कार आणि शिक्षण देण्यासाठीचा संकल्प, मुलींच्या न्याय्य हक्कांचा आणि सुरक्षिततेचा संकल्प, स्त्री शक्ती आणि मुक्तीचा, आत्मभान जागृत करण्याचा संकल्प, फक्त मी, माझे कुटुंबीय एवढाच संकुचित विचार सोडून समाजातल्या वंचित घटकांसाठी झटण्याचा संकल्प, असे कितीतरी वेगळे विचार आपण अंमलात आणायला हरकत नाही. निसर्गाच्या जवळ जाण्याचा हा सण असल्याने आपण निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी संकल्प नक्कीच करू शकतो. पर्यावरण स्नेही, पर्यायी गोष्टींचा वापर करण्याचा संकल्प तर आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. समाजातल्या सर्व अमंगळ गोष्टी, घटनांचे मळभ दूर होऊन नव्या वर्षात सारे काही चैतन्यमयी, आनंददायी घडो हीच सदिच्छा!
(लेखिका मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वर्ग समन्वयक आहेत.)