जालना : राज्यात मुद्दामहून कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून राज्य सरकार कोळसा नाही असे सांगत असले तरी राज्यात वीज निर्मिती करून ही वीज विकली जात असल्याचा धक्कादायक आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा दावाही दानवे यांनी केला आहे. ते आज जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात सध्या कोळसा तुटवडा निर्माण झाल्याने काही विद्युत प्रकल्पात काही दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे. यावर बोलताना दानवे म्हणाले की, ‘राज्यात कोळशाचा कृत्रिम तुटवडा असून कोळसा खात्याने सर्व राज्यांना पत्र पाठवून कोळशाचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले होते. कोळशाचे राज्याकडे ३ हजार कोटी थकीत असून राज्य कोळसा नाही असे सांगत असले तरी वीज निर्मिती करून ही वीज विकली जात असल्याचा आरोप दानवे यांनी राज्य सरकारवर केला आहे. तरीही आमच्याकडून कोळसा पुरवण्यात कोणतीही कमी नसून राज्यात मुद्दामहून कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून भ्रष्टाचार करण्याचा प्रकार सुरू असल्याचे’ दानवे म्हणाले.
दरम्यान, लोकांना विकासाची गरज आहे. काँग्रेसच्या ज्या आमदारांना मतदार संघात विकासासाठी निधी मिळत नाही. ते आमदार पुन्हा निवडून येतील का, असा सवाल उपस्थित करत आमच्या संपर्कात किती नाराज आमदार आहेत हे नाराज आमदारांची पत्रकारांनी भेट घेतल्यानंतरच कळेल. शिवाय राज्यातील नाराज आमदार आणि आमच्यात काय बोलणं सुरू आहे हे देखील उघड होईल, असेही दानवे यांनी सांगितले.