Friday, March 21, 2025
Homeदेशराज्यसभेत भाजपचे ‘शतक’; काँग्रेस रसातळाला

राज्यसभेत भाजपचे ‘शतक’; काँग्रेस रसातळाला

नवी दिल्ली: ईशान्य भारतातील ३ जागांवर विजय मिळवल्यानंतर भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या १०० झाली आहे. खासदारांचे ‘शतक’ पूर्ण करणारा भाजप हा १९८८नंतर पहिलाच राजकीय पक्ष ठरला आहे. याआधी ३३वर्षांपूर्वी काँग्रेसची सदस्य संख्या १००पेक्षा अधिक होती.

राज्यसभेच्या सदस्यांची संख्या २४५ इतकी असते. चार जागांपैकी भाजपने त्रिपूरामधील जागा विधानसभेतील संख्याबळावर जिंकली. नागालँडमध्ये एस. फाग्रोन कोनयक यांचा बिनविरोध विजय झाला. नागालँडमधून राज्यसभेवर जाणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. आसाममधील दोन जागांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात सदस्यांनी भाजप आघाडीला साथ दिली. यावेळी भाजपने मिळवलेल्या विजयात काँग्रेसला बसलेला मोठा धक्का म्हणजे ईशान्य भारतातून राज्यसभेवर काँग्रेसचा एकही सदस्य नाही. ईशान्य भारतातील राज्यांतून राज्यसभेवर एकूण १४ जागा आहेत. त्यापैकी १३ जागा भाजपकडे आहेत. तर आसाममधील एक जागा अपक्ष उमेदवार अजित कुमार भुया यांच्याकडे आहे.

ईशान्येतील चारपैकी तीन जागा जिंकल्याने भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या तीनने वाढून १००वर पोहोचली तर काँग्रेसची सदस्य संख्या ३३ वरून २९ झाली आहे. जुलै महिन्यापर्यंत काँग्रेसचे आणखी १३ सदस्य निवृत्त होतील. त्यापैकी अधिक तर जागा पुन्हा काँग्रेसला जिंकता येणार नाहीत. तेव्हा देखील भाजपचा एकतर्फी विजय निश्चित मानला जातो. राज्यसभेत काँग्रेसनंतर सर्वात मोठा पक्ष तृणमूल काँग्रेस असून त्यांचे १३ सदस्य आहेत. डीएमकेचे १० सदस्य तर बिजू जनता दलाचे ९ सदस्य आहेत. सीपीआय-एम, टीआरएस, वायएसआरसीपी यांचे प्रत्येकी ६ सदस्य आहेत. १९५२ साली काँग्रेसचे राज्यसभेत १४६ सदस्य होते तर भाजपचा फक्त एक सदस्य होता. १९६२-६४ मध्ये काँग्रेस १६२ तर भाजप ४, १९७२-७४ मध्ये काँग्रेस १२८ तर भाजप १४, १९८२-८४ मध्ये काँग्रेस १५२ तर भाजप १७, १९८८-९० मध्ये काँग्रेस १०८ आणि तर भाजप १७, १९९०-९२ मध्ये काँग्रेस ९९ तर भाजप ४५, २०१२-१३ मध्ये काँग्रेस ७२ तर भाजप ४७ आणि आता २०२२ मध्ये काँग्रेस २९ तर भाजप १०० अशी स्थिती आहे.

राजीव गांधींनी कमावले, पण… पंतप्रधान राजीव गांधी यांचे सरकार असताना १९८८मध्ये राज्यसभेत काँग्रेसचे १०० पेक्षा अधिक सदस्य होते. तेव्हा लोकसभेत भाजपचे फक्त दोन खासदार होते आणि आज त्यांचे ३०३ सदस्य आहेत. २४५ सदस्य असलेल्या राज्यसभेत १२३ हा बहुमताचा आकडा आहे. भाजप आणि एनडीएला आता कोणतेही सर्वसाधारण विधेयक मंजूर करून घेण्यासाठी कोणाची गरज नाही. भाजपसोबत जेडीयूचे ४ सदस्य आहेत. सोबत अण्णा डीएमकेचे ५ आणि बीजेडीचे ९ सदस्य देखील भाजपला पाठिंबा देते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -