Thursday, January 16, 2025
Homeमहत्वाची बातमीमराठी भाषेवर आक्रमण खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठी भाषेवर आक्रमण खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मराठी भाषा इतर भाषांवर आक्रमण करणार नाही. पण इतरांचे मराठीवर आक्रमण झालेल सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. मुंबईतील भाषा भवनाचे भूमिपूजन आज शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जवाहर बालभवन चर्नीरोड येथे पार पडले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

आपण जे काही करतोय ते जगातील सर्वोत्तम असावे, जेणेकरून जगभरातील लोक ते बघायला यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषेबद्दल बोलण्यापेक्षा मराठी भाषेमध्ये बोला. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आपल्याला पर्वा नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. जगभरात मराठी माणसे विखुरलेली आहे. त्यांना अभिमान वाटेल अशी ही वास्तू उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्या प्रकारे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रमध्ये मराठी भाषिकांवर अत्याचार होत आहे तो कदापी सहन करणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यांच्यामागे ठामपणे उभं राहायला हवे. या राज्यामध्ये मराठी भाषा शिकावी हा अत्याचार नाही. दुकानाच्या पाट्या मराठी असल्याच पाहिजेत पण काही लोकांना याची पोटदुखी झाली आहे . जर या मुंबईत मराठी भाषेचा ठसा पुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य ती अक्कल शिकवण्याची ताकद या मराठी भाषेत आहे. छत्रपतींच्या तलवारीसारखी मराठी भाषा तळपत राहिली पाहिजे, असे ठाकरे यांनी सांगितले.

मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन ही आपल्या आयुष्यातील एक मोठी घटना असल्याचे मुख्यमंत्री यांनी ठाकरे यांनी सांगितले.इतिहास विसरतो त्याला भविष्यकाळ राहत नाही. मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून संघर्ष करून मिळवली, असे ठाकरे यांनी सांगितले. मुंबई मिळवल्यानंतर मराठी माणसांचा गळा आवळण्याचे काम होत असते त्याला शिवसेना प्रमुख आणि शिवसेनेने विरोध केला. त्यामुळे मराठी भाषा भावनाचे भूमिपूजन आपल्या हातून होत असल्याने आपण भाग्यवान आहोत, असे त्यांनी सांगितले. मराठी रंगभूमीचा देखील समृद्ध वारसा आहे. त्याचे गतवैभव दाखव देणारे दालन सरकार उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी भाषा भवन मुख्य केंद्र उभारणीसाठी जवाहर बाल भवन येथील भूखंडावरील जागा देण्याचा निर्णय झाला. या ठिकाणी सुमारे दोन हजार १०० चौरस मीटर क्षेत्र भाषा भवनासाठी मिळणार असून, १२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईच्या मे. पी.के. दास ॲन्ड असोसिएट्स यांची वास्तुविशारद म्हणून निवड करण्यात आली आहे. तर चर्नीरोड येथील मराठी भाषा भवन आणि ऐरोली येथील मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -