Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

मंत्रिपदानंतर आता बंगलेही सोडावे लागणार

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने मंत्रिमंडळात नसलेल्या ज्येष्ठांनी अडवलेल्या प्रशस्त बंगल्यांकडे लक्ष वळविले आहे. मंत्रिमंडळातून अलीकडेच बाहेर गेलेल्या मंत्र्यांनाही सध्याचे बंगले सोडावे लागणार आहेत. माजी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना सफदरजंग रस्त्यावरील टाइप-८ श्रेणीतील मोठा बंगला त्यांना लवकरच सोडावा लागणार आहे. रविशंकर प्रसाद यांचा मुक्काम गेली अनेक वर्षे मदर तेरेसा क्रिसेंट भागातील मोठ्या बंगल्यात आहे. त्यांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे.


प्रकाश जावडेकर यांना ६ कुशक मार्ग येथील सध्याचा प्रशस्त बंगला सोडून तुघलक लेनमधील नवे निवासस्थान देण्यात आले आहे. तेथे आता मंत्री नारायण राणे रहायला येणार आहेत. जावडेकर यांनी काहीही खळखळ न करता नवीन बंगला स्वीकारण्याची तयारी दाखविल्याचे सीपीडब्लूडी अधिकाऱ्यांनी नमूद केले. मात्र त्यांना जो नवीन बंगला देण्यात आला तेथील माजी भाजप खासदारांनीच बंगला सोडण्यास विलंब केल्याची माहिती मिळते. आता महिनाभरात जावडेकर नवीन निवासस्थानी जाणार आहेत. निशंक यांचा बंगला ज्योतिरादित्य शिंदे यांना देण्यात आला आहे. मात्र निशंक बंगला सोडत नसल्याने शिंदे दिल्लीतील आनंद लोक भागातील आपल्या खासगी निवासस्थानी राहात आहेत.


मंत्रिपदावरून पायउतार झाल्यावर महिनाभरात सरकारी बंगला खाली करावा हा नियम कागदावरच राहिलेला दिसतो. दिल्लीत मुळात सरकारी संख्या मर्यादित असल्याने बंगल्याला चिकटून राहणाऱया अनेकांवर कारवाईच करावी लागते. मात्र सीपीडब्लूडी अनेकदा जास्तच सक्ती करीत असल्याचीही तक्रार आहे. सध्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत होताच सीपीडब्लूडीला काही महिनेही धीर धरवला नव्हता.


एका पावसाळी संध्याकाळी आठवले दिल्लीत नसतानाही लोधी इस्टेट भागातील त्यांच्या बंगल्यातील सामान, राज्यघटनेच्या प्रती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे, अन्य सामान संबंधित अधिकाऱ्यांनी पदपथावर आणून ठेवले होते. मोदी सरकारने तर याबाबत आणखी कडक धोरण ठेवले आहे. ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी न्यायालयात जाऊनही त्यांना तुघलक रस्त्यावरील बंगला त्वरित खाली करून देणे भाग आहे. दिवंगत मंत्री रामविलास पासवान यांनी अनेक दशके स्वतःकडे राखलेले १२ जनपथ हे निवासस्थान नुकतेच रिकामे करण्यात आले. येथे पासवानांचा पुतळा उभारण्याची चलाखी खासदार चिराग पासवान यांनी दाखविली. त्यालाही सरकारने दाद दिली नाही. आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना तो बंगला देण्यात आला आहे.

Comments
Add Comment