मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेला एक ई-मेल आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरडीएक्सच्या सहाय्याने स्फोट घडवून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांचे २० गट सक्रिय झाल्याचे या ई-मेलमध्ये म्हटले. सध्या देशातील तपास यंत्रणांकडून या ई-मेलसंदर्भात तपास सुरु आहे. मात्र, ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने आपले नाव उघड केलेले नाही. परंतु, आरडीएक्सच्या सहाय्याने स्फोट घडवून पंतप्रधान मोदींना घातपात करण्यात येईल, असे या मेलमध्ये म्हटले आहे. आपली ओळख उघड होऊन हा कट फसू नये, यासाठी ई-मेल केल्यानंतर आपण आत्महत्या करणार असल्याचेही संबंधित व्यक्तीने सांगितले आहे.
ई-मेलमध्ये म्हटल्याप्रमाणे हल्ल्याची संपूर्ण योजना तयार झाली आहे. हा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे सांगितले जाते. हा ई-मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. सध्या हा ई-मेल कुठून आला आणि मेल पाठवणारी व्यक्ती कोण, याचा कसून शोध घेतला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच राजधानी दिल्ली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर आली होती. तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संस्थेने काही लोकांना ई-मेल पाठवत दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली. सदर लोकांनी याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांकडे तक्रार दिली. दहशतवाद्यांकडून हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने दिल्ली पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवला होता. तसेच सरोजनी नगर मार्केटसह इतर भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते.