Friday, May 9, 2025

महामुंबईमनोरंजनमहत्वाची बातमी

शरद पवारांचा आदर पण ते दुटप्पी वागतात : विवेक अग्निहोत्री

शरद पवारांचा आदर पण ते दुटप्पी वागतात : विवेक अग्निहोत्री

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी मनात आदर आहे. परंतु, पवारांचे वागणे दुटप्पी असल्याची टीका सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली. पवारांकडून ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर टीका करण्यात आली. त्यानंतर अग्निहोत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर दिले.


नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक मेळाव्यात पवार म्हणाले की, देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. देशात सांप्रदायिक शक्तींचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. 'काश्मीर फाईल्स' या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रचार केला जात आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती, असे शरद पवार यांनी सांगितले. भाजपाकडून देशातील अभ्यासक्रम बदलवून लहान मुलांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवारांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची तारीफ केली होती, त्यावरही पवारांनी आक्षेप नोंदवला.


पवारांच्या या टीकेनंतर ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात ट्वीट करत अग्निहोत्री म्हणाले की, काही दिवसांपूर्वी विमान प्रवासात शरद पवार आणि त्यांच्या पत्नीची भेट झाली होती. मी आणि पल्लवीने नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्यांनी चित्रपटाबद्दल अभिनंदन करत आशिर्वादही दिले. परंतु, मीडियासमोर त्याचे काय झाले माहीत नाही. त्यांचा ढोंगीपणा उघड झाला असला तरीही मी त्यांचा आदर करतो, असे विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Comments
Add Comment