Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबईत नाल्यांतील गाळ काढणे, चर पुनर्भरणी मिळून एकूण ५४५ कोटींच्या कामांना प्रशासकांची मंजुरी

मुंबई : मुंबई महानगरातील पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नाल्यांमधील गाळ काढणे आणि रस्त्यांवरील चर पुनर्भरणी या दोन कामांची निकड लक्षात घेता त्यासाठीच्या मिळून एकूण ३० निविदांना महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. या सर्व निविदांच्या कामांची एकूण किंमत सुमारे ५४५ कोटी रुपये इतकी आहे.


पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्यासाठीच्या कामांचा विचार करता, मोठ्या नाल्यांसाठी एकूण ६ निविदा मंजूर करण्यात आल्या असून त्यांचे मूल्य सुमारे ७१ कोटी रुपये आहे. लहान नाल्यांसाठी सुमारे ९१ कोटी रुपये एकत्रित किंमतीच्या १७ निविदांना मंजुरी प्राप्त झाली आहे. यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६ तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी ९ याप्रमाणे निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, मोठे व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे १६२ कोटींच्या प्रस्तावांना प्रशासकांची मान्यता मिळाली आहे.


दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच्या रस्त्यांवरील चर पुनर्भरणी कामांचा भाग म्हणून परिमंडळनिहाय प्रत्येकी एक अशा ७ निविदांना देखील मान्यता मिळाली आहे. त्यांची एकत्रित किंमत ३८३ कोटी रुपये इतकी आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यासाठी ही मंजुरी मिळाल्याने उपयोगिता संस्थांना कार्यादेश देवून तातडीने कामे सुरु करता येणार आहेत.


नाल्यांमधील गाळ काढणे व चर पुनर्भरणीचे प्रस्ताव मंजूर झाल्याने ही दोन्ही महत्त्वाची कामे तातडीने सुरु करुन विहित वेळेत पूर्ण करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.

Comments
Add Comment