Friday, May 9, 2025

महामुंबईराजकीयमहत्वाची बातमी

महाविकास आघाडीतील ‘या’ दोन मंत्र्यांविरोधातील तक्रार मोदी सरकारने स्वीकारली

महाविकास आघाडीतील ‘या’ दोन मंत्र्यांविरोधातील तक्रार मोदी सरकारने स्वीकारली

मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आता महाविकास आघाडीमधील दोन नेत्यांवर निशाणा साधला आहे. हसन मुश्रिफ आणि अनिल परब यांना सोमय्या यांनी लक्ष्य केलं आहे. कारवाई झालेल्या मंत्र्यांमध्ये आता या दोन मंत्र्यांचा क्रमांक लागणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.


हसन मुश्रीफ यांनी शेल कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला असून त्यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. “न्यायालयाकडून या प्रकरणाच्या तपास करण्याचा आदेश दिला जाणार आहे. त्यांच्या कारनाम्यांवर आजपासून कारवाईला सुरुवात होणार”, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. न्यायालयामध्ये सरकारने याचिका दाखल केल्याचाही दावाही सोमय्यांनी केला आहे.


मुश्रीफ आणि परब यांनी केलेल्या घोटाळ्यांसंदर्भात आपण भारत सरकारकडे तक्रार केल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकारने ही तक्रार स्वीकारली असून आजपासून यासंदर्भात घडामोडी सुरु होतील असं वक्तव्य सोमय्या यांनी केलं आहे. हा एकूण १५८ कोटींचा घोटाळा असून यामध्ये ईडी, कंपनी मंत्रालय, प्राप्तीकर विभागाकडून कारवाई केली जाईल, अशी शक्यताही सोमय्यांनी व्यक्त केली आहे.


अनिल परबांवर निशाणा साधताना सोमय्यांनी, “ते मागील सहा महिन्यापासून रोज बोलतात की माझा रिसॉर्टशी संबंध नाही. परबांनो मोदी सरकारनेच याचिका दाखल केली आहे. तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात. भारत सरकारची याचिका आहे, न्यायालयाने दखल घेतलीये. १६ एप्रिलला सुनावणी आहे,” असं म्हटलं आहे. “परब यांनी खरमाटे आणि सचिन वाझेंकडून पैसे घेतले आणि रिसॉर्ट बांधला, कोव्हीडच्या नावाखाली, लॉकडाऊन केला आणि घोटाळा केला, परबांनो बॅग भरा तयारी करा,” असंही सोमय्या म्हणाले आहेत.

Comments
Add Comment