पणजी : कोरोनाचा संसर्ग जवळपास संपुष्टात आल्याने महाराष्ट्रातील कोरोनाबाबतचे सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आज महाराष्ट्राशेजारील गोव्यातील बिट्स पिलानी शिक्षणसंस्थेच्या कॅम्पसमध्ये एकाच वेळी २४ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर अलर्ट झालेल्या प्रशासनाने कॅम्पसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ऑफलाईन क्लास स्थगित करण्यात आले आहेत. बाधितांना क्वारेंटाईन करून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. देशात कोरोनाची रुग्णसंख्या अगदी कमी झाली असताना गोव्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.
बिट्स पिलानीचा गोव्यातील कॅम्पस वास्कोमधील झुआरीनगर येथे आहे. येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने वास्कोचे उपजिल्हाधिकारी दत्ताराज देसाई यांनी आदेश जारी करून कॅम्पसमध्ये कोरोनाच्या चाचणीशिवाय कुणाच्याही येण्यावर बंदी घातली आहे. तसेच सर्वांना मास्क घालणे आणि दोन मीटरचं अंतर राखणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याशिवाय पुढच्या १५ दिवसांसाठी सर्व वर्ग ऑनलाईन भरवण्याची सूचना देण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाबाधित लोकांना क्वारेंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची वेगळी व्यवस्था केली जाईल. त्यांनी सांगितले की, या लोकांच्या संपर्कात जे कुणी आले आहेत, त्यांनी कोरोनाच्या प्रोटोकॉलचे व्यवस्थित पालन करावे. तसेच या सर्व लोकांची आरटीपीसीआर चाचणीही केली जाईल.
दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे १३३५ नवे रुग्ण सापडले आहेत. तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १४ हजार ७०४ एवढी आहे. देशाचा रिकव्हरी दर ९८.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.