मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांविरोधात वक्तव्ये करत असताना आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी जाहीर केली आहे. त्यांनी आपली नाराजी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे. शिवसेना भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना राष्ट्रवादी मात्र मवाळ भूमिका घेत असल्याचे ठाकरेंनी शरद पवारांना सांगितले.
केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील सदस्यांना टार्गेट करत असताना राष्ट्रवादी मवाळ भूमिका घेत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादी भाजपाला आव्हान देण्याची वेळ आली तेव्हा बॅकफूटवर गेल्याच्या काही घटनाही सांगितल्या आहेत. त्यात विधानसभा विरोधी पक्षनेते फडणवीस यांना बीकेसीमधील सायबर विंगच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्याचा बदललेला निर्णय, नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही बाजूंनी संयम राखावा आणि गोष्टी हाताबाहेर जाण्यापासून रोखावे असे केलेले आवाहन आदींचा समावेश आहे.
राज्यात फक्त आम्हीच लढा देत आहोत. फक्त शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादीच्या वतीनेही आम्हीच लढत आहोत. शिवसैनिक फ्रंटफूटवर जाऊन लढत असताना राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर दिसत आहे. ज्याप्रमाणे त्यांना भाजपाविरोधात भूमिका घेतली पाहिजे तशी घेताना ते दिसत नाहीत, असे एका वरिष्ठ शिवसेना नेत्याने म्हटले आहे. शिवसेनेला भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांचा सामना करण्यासाठी पोलीस आपल्या बाजूला हवे आहेत आणि तिथेच मुळात हा वाद सुरु आहे. कारण गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे.
एकमेकाला मदत कशी होईल हाच प्रयत्न : अजित पवार
अजित पवारांना उद्धव ठाकरेंच्या नाराजीबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील. आम्ही एकटे काम करत नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींनी मिळून ही महाविकास आघाडी तयार केली आहे. त्याबद्दल सर्व मिळून निर्णय घेतील. काम करताना एकमेकाला मदत कशी होईल हाच प्रयत्न असतो.
शिवसेनेचा गृहखात्यावर आक्षेप असल्यासंबंधी विचारलं असता, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जास्त अधिकारवाणीने सांगतील असं सांगत अजित पवारांनी जास्त भाष्य करणं टाळले.