मुंबई : आमदारांना म्हाडाची घरं देण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे संकेत दिले आहेत. घरांबाबतचा निर्णय कदाचित रद्द केला जाईल, असे अजितदादा म्हणाले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना ३०० घरे देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेला भाजप आणि मनसेने विरोध केला होता. राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असलेल्या म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतून ही घरे देण्यात येणार होती. या निर्णयाला सामान्यांनी विरोध सुरु करताच ही घरे फुकट देणार नसल्याचे मंत्री आव्हाड यांनी नंतर सारवासारव केली होती.
आमदारांना मोफत घरे देण्याच्या निर्णयाला शरद पवार यांनी विरोध केला आहे. गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे. मात्र, ते ही त्या घरांची योग्य किंमत घेऊन त्यांना घर दिले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.