अलिबाग (वार्ताहर): पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खासदार सुनील तटकरे कुटुंबियांसोबतच्या स्नेहभोजनावर रायगड मधील शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. त्यांची नाराजी समाजमाध्यमांवर पाहायला मिळत असून संतप्त आणि तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याची सांगता बुधवारी माणगाव येथील मेळाव्याने झाली. हा मेळावा आटोपल्यानंतर आदित्य ठाकरे हे थेट सुतारवाडीत सुनील तटकरे यांच्या गीताबाग या निवासस्थानी पोहोचले.तटकरे कुटुंबियांसमवेत गप्पा झाल्यानंतर त्यांनी स्नेहभोजन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत परिवहन मंत्री अनिल परब हेदेखील होते.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रायगड जिल्ह्यात सध्या बेबनाव आहे. रायगडमध्ये पालकमंत्री अदिती तटकरे यांना हटवण्यासाठी शिवसैनिक मोर्चेबांधणी करीत आहेत. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी रायगडमधील आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले आहे. असे असताना युवानेते पालकमंत्र्यांच्या घरी स्नेहभोजनाला गेल्यामुळे शिवसैनिकांची मने दुखावली आहेत. याबाबत समाजमाध्यमांवर शिवसैनिक त्यांच्या मनातील खंत व्यक्त करत आहे. आज खऱ्या अर्थाने हरलो, हा तर निष्ठावंत शिवसैनिकांचा खच्चीकरण मेळावा. अशा वैफल्यग्रस्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहेत.
शिवसैनिकांकडून पालकमंत्री हटावचे फलक
आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपदावरून दूर करा, अशी मागणी रायगडमधील शिवसेनेच्या आमदारांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात याची चर्चा होणार नाही किंवा त्या मागणीचा पुनरुच्चार केला जाणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून ते यावर निर्णय घेतील, असे आमदार भरत गोगावले यांनी महाड येथे स्पष्ट केले होते. मात्र मेळाव्यात आदित्य ठाकरे भाषणाला उभे राहिले असता शिवसैनिकांनी पालकमंत्री हटाव अशी घोषणाबाजी केली तसेच फलक झळकावले. यावर, आपली राज्यात आघाडी आहे , असं काही करु नका, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगताना शिवसैनिकांना थांबवण्याचा प्रयत्न केला.