नवी दिल्ली : राजकारणात काम करताना ज्ञानाहून अनुभव श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राज्यसभेतील 72 खासदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे गुरुवारी त्यांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभानंतर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधानांनी सर्व मावळत्या सदस्यांना पुढील वाटचालीसाठी त्य़ांनी शुभेच्छा दिल्या.
खासदारांना निरोप देताना मोदी म्हणाले की, या संसदेत आपण बराच काळ घालवला आहे. या सदनाने आपल्या जीवनात जेवढं योगदान दिलं, ते आपण सभागृहासाठी दिलेल्या योगदानापेक्षा जास्त आहे. या सभागृहाचा सदस्य म्हणून जमवलेला अनुभव सदस्यांनी देशाच्या चारही दिशांना नेला पाहिजे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच आमच्या राज्यसभा सदस्यांना खूप अनुभव आहे. कधीकधी अनुभवात शैक्षणिक ज्ञानापेक्षा जास्त ताकद असते. निवृत्त होणाऱ्या सदस्यांना आम्ही पुन्हा येण्याचे आवाहन करतो असेही पंतप्रधानांनी सांगितले.