नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने पहाटे ५ वाजता (ईडी) छापा टाकला. सीआरपीएफचे जवान यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. जवळपास चार तास अधिकाऱ्यांनी उकेंच्या घराची झाडाझडती घेतली.
जमीन खरेदी प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने उकेंच्या घरावर छापा टाकल्याचे समजते. छापा पडला त्यावेळी सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरी होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस नेते नाना पटोलेंनी दाखल केलेल्या प्रकरणात उके युक्तिवाद करत आहेत. याशिवाय उके हे विरोध पक्षनेते फडणवीस यांच्याविरोधातही खटला लढत आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच नागपुरचा दौरा केला. या दरम्यान उके यांनी तीनवेळा राऊतांची भेट घेतली. आता उके यांच्या घरावर धाड पडल्यानंतर पुढे पटोलेंच्या घरावर छापा टाकला जाऊ शकतो, असे राऊत म्हणाले. पुढल्या काही दिवसांत पटोलेंच्या घरावर धाडी पडल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. अशा धाडी पडल्या की विरोधी पक्षातले नेते कर नाही त्याला डर कशाला, असे म्हणतात. पण तपास यंत्रणांना भाजपच्या नेत्यांविरोधात आम्ही पुरावे दिले तरी काहीच कारवाई करत नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केला.