सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस सुरु असलेल्या मुक्या प्राण्यांच्या झुंजींना पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी गोवंश रक्षण समिती आणि महाराष्ट्र लोकाधिकार समिती सदस्य अविनाश पराडकर यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी आज कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिले. दोन दिवसांपूर्वी मालवण तालुक्यातील एका गावात झालेल्या बैलांच्या झुंजीत एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
कुडाळ पोलिसांना निवेदनात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुक्या प्राण्यांच्या झुंजी लावण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या बैलांच्या एका जीवघेण्या झुंजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या झुंजीत एका बैलाला अप जीव गमवावा लागला. त्या बैलाने आपला जीव गमवावा लागल्यानंतरही काही विकृत लोक आपल्या तितक्याच विकृत आनंदासाठी त्या बैलाला त्रास देत असल्याचे त्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून झुंजींच्या या प्रकारावर चोहीबाजुंनी टीका होत आहे. या प्रकारामुळे आपल्या शांतीप्रिय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लौकिकाला अक्षरशः काळिमा फासला गेला आहे. आपल्या जिल्ह्यात इतकी हिंस्त्र आणि क्रूर घटना आजपर्यंत कधीही घडलेली नाही. मात्र या घटनेने सर्वांचीच मान शरमेने खाली गेली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरु असलेले हे जीवघेणे प्रकार त्वरित थांबवून असा प्रकारांना खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणीनिवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष प्राणी क्लेश निवारण समिती, मालवण पोलीस ठाणे आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली आहे.