मुंबई (प्रतिनिधी) : नालेसफाईच्या कामाबाबत भाजप आक्रमक झाली असून भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पालिकेच्या प्रशासकांची भेट घेतली. दरम्यान मार्च महिन्यात सुरू होणारी नालेसफाई अद्यापही झालेली नाही तर यावेळी कंत्राटच मंजूर झालेले नसल्याने १५ एप्रिल नंतरच नालेसफाई सुरू होणार आहे. यामुळे सुमारे ३७५ कि. मी.चे नाले अवघ्या दिड महिन्यात कसे साफ होणार? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. तर तातडीने नालेसफाईच्या कामांना मंजुरी द्या अशी मागणी शेलार यांनी पालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.
दरवर्षी मुंबईत नालेसफाईला मार्च महिन्यात सुरुवात होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने निविदा काढून ७ मार्चला स्थायी समितीत १६० कोटींचा प्रस्ताव मंजूरीसाठी आणला होता. पण सत्ताधाऱ्यांनी तो राखून ठेवला. त्यानंतर पालिकेची मुदत संपली प्रशासक नियुक्ती झाले. एवढ्या उशिरा सुरुवात करून कामे कशी पूर्ण होणार, जर कामे वेळेत पूर्ण झाली नाही तर मुंबईकरांना यावेळी पावसाळ्यात भयाण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशी भीती आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
सत्ताधारी पक्षाने पळ काढला तरी आम्ही या विषयाचा पाठपुरावा करणार, वेळेत कामे पूर्ण व्हावीत, भ्रष्टाचार होणार नाही, पूर्ण गाळ काढला जाईल यासाठी आम्ही मुंबईकरांच्या वतीने या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले.