औरंगाबाद : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले आहेत. औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याची घटना समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, काही व्यक्तींकडून नशेसाठी झोपेच्या गोळ्यांची तसेच इतर औषधांची डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय खरेदी होत असल्याचे औरंगाबाद शहरात निदर्शनास आले. औषधे विक्रि करताना डॉक्टरांची चिठ्ठी शिवाय विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनेचे परवाने कायमस्वरुपी रद्द होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ हा कायदा राबविला जातो. यानुसार डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री करणे गुन्हा आहे असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, औरंगाबाद येथे घडलेल्या या प्रकाराची चौकशी सुरु असून, संबंधितावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्या ठिकाणी असे प्रकार आढळून येतील त्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करून कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.