Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयतात्पर्ययाला बलात्कार म्हणायचे का?

याला बलात्कार म्हणायचे का?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

व्यक्तीच्या संमतीशिवाय किंवा बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बलात्कार होय. यात पीडित व्यक्ती ही पुरुष किंवा बहुतांशी स्त्री असते. हा एक लैंगिक अत्याचार व कायदेशीर गुन्हा आहे. जर बलात्कार एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केला, तर मग त्याला ‘सामूहिक बलात्कार’ म्हणतात. बलात्कार हीन अपराधांच्या श्रेणीत येतो ज्याची शिक्षा आयुष्यभर किंवा मृत्यूपर्यंत होण्याची शक्यता आहे. बलात्काराचे न्यायालयीन अहवाल, सुनावणी आणि दंड वेगळे आहे. बलात्कार गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. बलात्कार स्त्रियांवरच होवू शकतो. शारीरिक रचनेमुळे बलात्कारितेला भयंकर अशा शारीरिक, मानसिक यातनांना तोंड द्यावे लागते. भारतात बलात्कार हा दखलपात्र गुन्हा आहे. सर्वसाधारणपणे हे झाले बलात्कारसंबंधित कायदेशीर विश्लेषण.

आजपर्यंत चित्रपट, कथा, नाटक इत्यादींसारख्या करमणुकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बलात्काराचे प्रसंग चित्रीकरण केलेले पाहिलेले आहेत. एखादी स्त्री तीव्र प्रतिकार करीत असताना आरडा-ओरडा करीत असताना, जिवाच्या आकांताने ओरडत असताना, मदतीची याचना करीत असताना, एका किंवा अनेक पुरुषांनी तिच्याशी झटापट करून, बळजबरी करून, तिला शारीरिक दृष्टीने इजा करून, तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा एकतर्फी प्रयत्न करणे म्हणजे बलात्कार असेच या चित्रिकरणांमधून सर्वसाधारणपणे पहायला मिळालेले आहे. वर नमूद केलेल्या सविस्तर माहितीनुसार कायद्यानेदेखील बलात्काराची व्याख्या, संबंधित आरोपी आणि फिर्यादी व्यक्तीमधील सर्व घटनाक्रम, प्रसंग, त्यावेळची परिस्थिती, पुरावे, साक्षीदार आणि न्यायालयात चाललेला युक्तिवाद यानुसार बलात्कार या घटनेकडे विविध दृष्टिकोनांतून, विविध उदाहरणे अभ्यासून कालानुरूप बदल केलेले आहेत.

चित्रपटातील दृश्य अतिशयोक्ती, अतिरंजित असतात हे जरी खरे असले तरी आपण अनेक प्रत्यक्षात समाजात घडलेल्या बलात्कारच्या केसेसमधून सर्वसाधारण हेच पाहतो आणि ऐकतो की, स्त्रीशी जबरदस्तीने संभोग करण्याचा प्रयत्न म्हणजे बलात्कार! त्यामुळेच या गुन्ह्यासंदर्भातील कायदे अतिशय कडक होऊन, त्यावर ताबडतोब अंमलबजावणी होणे, आरोपीला कठोर शासन होणे यासाठी आपण सर्वजण व आपला समाज आग्रही असतो. या संदर्भातील कलम, कायदे यांवर अनेक मतमतांतरे असून त्यात सातत्याने सुधारणा केली जात असते. प्रत्येक पीडित स्त्रीच्या चारित्र्य, आत्मसमान, प्रतिमा, प्रतिष्ठा, इज्जत आणि पूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा असा हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे या परिस्थितीमधून जाणाऱ्या प्रत्येक पीडित मुलीला, महिलेला न्याय मिळणे तिचा हक्क आणि अधिकार आहे.

परंतु समुपदेशनाला आलेल्या काही प्रकरणांमध्ये असे जाणवते की, अनेक महिलांना बलात्काराची केस एक हत्यार वाटते. अतिशय सहजासहजी एखाद्या पुरुषाला बदनाम करण्यासाठी बलात्कार हा शब्दप्रयोग महिला करताना दिसतात. एखाद्या पुरुषावर बलात्काराची तक्रार करणे, त्यातून त्याला शिक्षा होण्याची इच्छा ठेवणे, त्याचे कुटुंब बरबाद करणे व त्याचा बदला घेणे, त्याला उद्ध्वस्त करणे हेच जणू अशा महिलांचे ध्येय असते आणि का तर कायदे महिलांच्या बाजूने आहेत! अशा केसमध्ये महिलेला सहानुभूती मिळेल, लढण्यासाठी सर्व सहकार्य पाठिंबा मिळेल, अशी तिची धारणा असते.

विवाहबाह्य संबंध असलेल्या महिला, एकापेक्षा जास्त परपुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या महिला, अथवा अविवाहित तरुणी अथवा महिला, विधवा आणि घटस्फोटित महिला या कायद्याचा सर्रास दुरुपयोग करताना दिसतात आणि त्यानुसार मार्गदर्शन, सल्ले मागायलादेखील येतात.

जोपर्यंत एखाद्या पुरुषाशी स्वतःचे सुरू असलेले अनैतिक शारीरिक संबंध गोडीत आहेत, दोघांमध्ये सर्व काही समझोत्याने सुरू आहे, समोरील पुरुष आपल्या सर्व मागण्या पूर्ण करतोय तोपर्यंत या महिला अतिशय आनंदाने, स्वखुशीने वर्षांनुवर्षे त्याच्यासोबत सर्व प्रकारचे संबंध प्रस्थापित करून असतात; परंतु कोणत्याही कारणास्तव हे संबंध डळमळीत होऊ लागले, समोरून मिळणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक लाभ बंद होऊ लागले की, या स्त्रीसाठी प्रियकर बलात्कारी होऊ लागतो.

पुरुषाकडून त्याच्या घरी हे संबंध लक्षात आले म्हणून, त्याचे मन भरले म्हणून अथवा दुसरी मैत्रीण भेटली म्हणून अथवा अन्य कोणत्याही विषयावरून दोघांत काही कारणास्तव वाद झाले म्हणून हे संबंध संपवण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा महिलेशी असे तात्कालिक, गंमत म्हणून, चेंज म्हणून अथवा गरजेपोटी निर्माण केलेले संबंध पुरुषांना संपुष्टात आणायचे असतात, त्यावेळेस पुरुष तिला टाळणे, तिला इमोशनल करून त्याची मजबुरी सांगणे, तिला प्रेमात करण्याच्या त्यागाच्या मोठ-मोठ्या कहाण्या सांगून तिचं मन, मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. कालांतराने तिच्याशी अबोला धरणे, स्वतःची वर्तवणूक बदलणे, तिच्या फोन, मेसेजला उत्तर न देणे, हे सर्व उपाय पुरुष करून पाहतात. प्रकरण गळ्याशी येऊ शकते, समोरील महिला आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकते, या भीतीने पुरुष बचावाचा पवित्रा घेतात. कोणत्याही कारणास्तव जर पुरुष संबंधित महिलेला असे अपमानित करून, अचानक झिडकारू लागला, तर तिची मानसिक स्थिती बिघडणे स्वाभाविक आहे.हे सर्व प्रकार करूनही जर संबंधित महिला आपल्याला सहजासहजी सोडत नाही किंवा सोडणार नाही हे लक्षात आल्यावर तिला स्वतःच्या कुटुंबीयांमार्फत, मित्रांमार्फत समजावण्याचा प्रयत्न पुरुषांमार्फत केला जातो. महिलेकडे दोघांमधील संबंधांचे काही पुरावे असतील, तर तिच्यावर दबाव आणून वेळप्रसंगी तिला धमकावून हे पुरावे नष्ट करण्याबाबत सांगितले जाते.

यामुळे महिला कितीही व्यथित झाली तरी अशा परिस्थितीमध्ये संबंधित महिलेकडे कोणतेही कायदेशीर पाठबळ, पुरावा या पुरुषावर हक्क अधिकार सांगण्यासाठी नसतो. अशा प्रकारचे संबंध शक्यतो एकमेकांना आधीच सर्व खरं सांगून, ठेवले गेलेले असल्यामुळे दोघेही अथवा एकजण विवाहित असूनसुद्धा ठेवलेले असतात. (क्रमश:)
meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -