मुंबई : नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्पासाठी आता पर्यायी जागेचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला दिले असून रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ जानेवारी २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिफायनरी संदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार रिफायनरीबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. यासोबतच रिफायनरीसाठी नाणारच्या शेजारीच असणा-या बारसू येथील नव्या जागेचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दिला आहे.
नाणार रिफायनरीला स्थानिकांचा विरोधात आहे. यामुळे नाणार ऐवजी आता रिफायनरीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव आणि पश्चिम भागातील गावातील काही गावांचा समावेश आहे. बारसू रिफायनरीसाठी जवळपास १४ हजार एकर जमीन आणि बंदरासाठी जवळपास २४१४ एक जागा देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने या पत्रात दर्शवली आहे. यामुळे रिफायनरी प्रकल्प हा रत्नागिरीतच होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान, नाणार इथला तेलशुद्धीकरण प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे बारगळला होता. प्रकल्पाच्या विरोधातील स्थानिकांच्या आंदोलनाला साथ देत शिवसेनेने नाणार प्रकल्प जाणार अशी भूमिका घेतली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारचे मनपरिवर्तन झाल्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे नाणारचा मार्ग आता मोकळा झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
‘सरकार तुम्ही दाद घ्या ना… रिफायनरी राजापूरला द्या ना’, अशी साद घालत महिलांसह राजापूरवासीयांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे ‘धोपेश्वर रिफायनरी झालीच पाहिजे’, अशी आग्रही मागणी केली. या वेळी महिलांनी ठाकरे यांना गुढी भेट देऊन धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योगाची म्हणजेच राजापूरच्या सर्वांगीण विकासाची गुढी उभारण्याची मागणी केली. या वेळी ठाकरे यांनीही महिलांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.