नवी दिल्ली : देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकासाचे वेगवर्धक असून त्यांना बळकट करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयाय) यांच्या वतीने आयोजित सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग स्पर्धात्मकता आणि विकास या विषयावरील दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते . यावेळी त्यांनी देशांतर्गत उत्पादनात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या महत्त्वावर भर दिला. बऱ्याच काळापासून, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग किमान संसाधनांमध्ये काम करत आहेत आणि तरीही देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यामुळे हे आपल्या हातात असलेले, विकासाला वेग देणारे उद्योगक्षेत्र बळकट करणे आवश्यक आहे, असे राणे यांनी सांगितले. या क्षेत्राला बळकट करण्यासाठी निश्चितच या दिशेने महत्त्वपूर्ण सामूहिक प्रयत्न झाले आहेत आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नवीन मार्ग खुले करण्याच्या दिशेने सरकारच्या विविध योजना चालना देत आहेत, असे त्यांनी सांगितले.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला वित्तीय संस्थांकडून अखंड पतपुरवठा, विकास आणि आधुनिकीकरणासाठी तंत्रज्ञान पाठबळ, निर्यातीसाठी बाजारपेठांमध्ये प्रवेश, पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी सुविधा आणि या क्षेत्रात कार्यरत मनुष्यबळाचे कल्याण या बाबी सरकारने चांगल्या प्रकारे सुनिश्चित केल्या आहेत, असे ते म्हणाले. दोन दिवसीय परिषदेत विविध विचारमंथन सत्र होणार आहे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगा क्षेत्रातील सुधारणा, आव्हाने आणि विकासाच्या संधींवर परिसंवाद होणार आहे त्याचप्रमाणे भारत, सिंगापूर, पेरू, लाओ पीडीआर, रवांडा, म्यानमार, रशिया, उझबेकिस्तान, स्पेन आणि इराणमधील वक्ते आणि तज्ञ या परिषदेत उपस्थित आहेत.