नवी दिल्ली : आज देशात पहिल्यांदाच ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी कार धावली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कारमधून संसदेत दाखल झाले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीला ग्रीन हायड्रोजन सर्वात मोठा पर्याय असून याचा खर्च प्रति किलोमीटर २ रुपये येईल, असे नितीन गडकरी म्हणाले.
गडकरी यांनी ‘ग्रीन हायड्रोजन’ने युक्त कारचे प्रात्यक्षिक बघून त्याचे परीक्षण केले. यावेळी गडकरी यांनी हायड्रोजन, FCEV तंत्रज्ञान आणि भारतासाठी हायड्रोजन-आधारित समाजाला समर्थन देण्यासाठी त्याच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवण्याच्या गरजेवर भर दिला.
ग्रीन हायड्रोजन भारतात तयार केले जाईल, देशात शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन रिफ्युलिंग स्टेशन्सची स्थापना केली जाईल, असे आश्वासन नितीन गडकरींनी माध्यमांशी बोलताना दिले.
भारत लवकरच हरित हायड्रोजन निर्यात करणारा देश होणार आहे. भारतातील स्वच्छ आणि अत्याधुनिक गतिशीलतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून केंद्र सरकार ‘नॅशनल हायड्रोजन मिशन’द्वारे हरित आणि स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही गडकरी म्हणाले.
केंद्र सरकारने ३००० कोटी रुपयांचे मिशन सुरू केले असून देश हायड्रोजन निर्यात करणार देश बनेल. जिथं कोळशाचा वापर होतो तिथं ग्रीन हायड्रोजन इंधनाचा वापर होईल. ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी आम्ही पाण्यापासून तयार होणारा ग्रीन हायड्रोजन वापरण्याचं ठरवलं आहे. ही कार पायलट प्रोजेक्ट आहे. आता देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू होईल. आयातीला आळा बसेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वासही नितीन गडकरींनी व्यक्त केला.