Monday, April 28, 2025
Homeताज्या घडामोडीभाजपचे मिशन २०२४

भाजपचे मिशन २०२४

एकहाती सत्ता मिळवण्याचा ठरला प्लान; १२ प्रमुख शिलेदारांवर जबाबदारी

मुंबई (प्रतिनिधी): भाजपने २०२४ मध्ये एकहाती सत्ता हस्तगत करण्यासाठीची प्राथमिक योजना निश्चित केली. राज्यातील १२ प्रमुख नेत्यांवर महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या सर्व शक्यता मावळल्यानंतर भाजपने आता महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार केला आहे. २०२४मध्ये होऊ घातलेली आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा मानस भाजपने यापूर्वीच जाहीर केला होता. त्यानुसार आता भाजपने आता पावले टाकायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने २०२४ मध्ये एकहाती सत्ता हस्तगत करण्यासाठीची प्राथमिक योजना निश्चित केली.

भाजपच्या १२ प्रमुख नेत्यांवर महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी असेल. यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे असेल. तर धुळे आणि नंदूरबारमध्ये भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी रावसाहेब दानवे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड आणि जालना या लोकसभा मतदारसंघांच्या मोर्चेबांधणीची कामगिरी सोपवण्यात आली आहे.

याशिवाय, १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत भाजपचे नेते महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. तर मुंबईतील प्रत्येक वॉर्डात भाजपकडून पोलखोल अभियान राबवले जाणार आहे. या सगळ्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय हवा चांगलीच तापण्याची चिन्हं दिसत आहेत.

एकदा धोका खाल्लाय वारंवार खाणार नाही : फडणवीस

उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला होता. आम्ही एकदा धोका खाल्लाय, वारंवार खाणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -