भारतात सध्या आयपीएलची धुमशान सुरू झाली आहे. दुसरीकडे, न्यू्झीलंडमध्ये आयसीसी महिलांचा वर्ल्डकप अंतिम टप्प्यात आहे. या वर्ल्डकपमधील भारताचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले. मिताली राज आणि सहकाऱ्यांना उपांत्य फेरी गाठता आली नाही. सहभागी आठ संघांमध्ये भारताचा संघ पाचव्या स्थानी फेकला गेला. साखळीमध्ये सातपैकी केवळ तीन सामने जिंकता आले. मागील स्पर्धेतील गतउपविजेत्यांची कामगिरी लौकिकाला साजेशी नक्कीच नाही. आजवरच्या १२ स्पर्धांपैकी ११मध्ये भारताने सहभाग घेतला. त्यातील २००५मध्ये दक्षिण आफ्रिकेत आणि २०१७मधील इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धांत उपविजेतेपद ही सर्वोत्तम कामगिरी आहे. १७ वर्षांपूर्वीच्या पहिल्यावहिल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून मात खावी लागली. मागील खेपेस म्हणजे पाच वर्षांपूर्वी इंग्लिश भूमीत यजमान इंग्लंडकडून पराभव झाला. गत वर्ल्डकपमधील हुकलेले जेतेपद तसेच आयसीसी वनडे क्रमवारीतील (रँकिंग) चौथे स्थान पाहता यंदा किवींच्या देशात सुरू असलेल्या स्पर्धेत भारताकडे जेतेपदाचा एक प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र क्रिकेटपटूंना चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत.
यंदाच्या वर्ल्डकपमधील भारताची कामगिरी तुलनेत खराब झाली. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून आश्वासक सुरुवात केली तरी यजमान न्यूझीलंडविरुद्ध सातत्य राखता आले नाही. पुढील सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवून चुका सुधारल्या तरी बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध नन्नाचा पाढा कायम राहिला. बांगलादेशला हरवून अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यादृष्टीने आव्हान कायम राहिले तरी इंग्लंडविरुद्ध पराभव झाला. शेवटच्या टप्प्यात रंगत वाढल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला, तरच बाद फेरीची आशा होती. निर्णायक सामन्यात सांघिक कामगिरी उंचावली तरी निसटता पराभव झाला आणि बॅगा पॅक करण्याची वेळ आली. शेवटच्या सामन्यात मात खावी लागली तरी प्रत्येकाचे योगदान पाहता प्रेक्षकांची मने जिंकण्यात भारताच्या क्रिकेटपटूंना यश आले. हेच टीम स्पिरीट न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या बलाढ्य संघांविरुद्ध दिसले असते, तर दिमाखात उपांत्य फेरीत पोहोचता आले असते. मात्र सुरुवातीची हाराकिरी महागात पडली.
क्रिकेट हा सांघिक खेळ असला तरी वैयक्तिक कामगिरीवर खूप काही अवलंबून असते. क्षेत्ररक्षणात (फिल्डिंग) मैदानावरील सर्वच्या सर्व अकरा क्रिकेटपटू सांघिक कामगिरी उंचावण्यात योगदान देऊ शकतात. मात्र बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये नेमक्या क्रिकेटपटूंवर अवलंबून राहावे लागते. प्रमुख आणि भरवशाचे बॅटर आणि बॉलर अपेक्षित खेळ करू शकले नाही, तर विजय सोपा नसतो. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये उपकर्णधार हरमनप्रीत कौर, सलामीवीर स्मृती मन्धाना यांनाच फलंदाजीत सातत्य राखता आले. या दुकलीला यास्तिका भाटियाची चांगली साथ लाभली. कर्णधार मिताली राजसह आणखी एक ओपनर शफाली वर्मा, अष्टपैलू दीप्ती शर्मा यांनी निराशा केली. अन्य बॅटर्सना अपेक्षित योगदान देता आले नाही. फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांचे अपयश मोठे आहे. अनुभवी डावखुरी स्पिनर राजेश्वरी गायकवाडसह ऑफस्पिनर स्नेह राणा आणि युवा मध्यमगती गोलंदाज पूजा वस्त्रकारने थोडी फार छाप पाडली. मात्र अनुभवी मध्यमगती गोलंदाज झुलन गोस्वामी फ्लॉप ठरली. फिरकीपटू दीप्ती हिलाही विकेट मिळाल्या नाहीत. एकूणच भरवशाच्या काही क्रिकेटपटूंच्या खराब कामगिरीमुळे भारताचे आव्हान अपेक्षेपेक्षा लवकर आव्हान संपुष्टात आले. तरीही ढेपाळलेल्या कामगिरीसाठी कुणा एका क्रिकेटपटूला जबाबदार ठरवता येत नाही. वर्ल्डकपमधील निराशाजनक कामगिरीनंतर टीकाकारांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. त्याचा सामना बीसीसीआयसह प्रमुख क्रिकेटपटू, प्रशिक्षक यांना करावा लागेल. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला संघाच्या खालावलेल्या कामगिरीची दखल घेण्यासह आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे.
आयसीसी विश्वचषक स्पर्धा प्रत्येकी चार वर्षांनी होत असली तरी कोरोनामुळे यंदाचा वर्ल्डकप एका वर्षाने लांबला. त्यामुळे पुढील विश्वचषक स्पर्धेला आता तीन वर्षे उरलीत. त्याची तयारी आतापासूनच करावी लागेल. भारताची सर्वात यशस्वी कर्णधार मिताली राज आणि वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट नावावर असलेली मध्यमगती गोलंदाज झुलन गोस्वामी यांची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा असू शकते. चाळीशीतील या प्लेयर्सना फॉर्म आणि फिटनेस राखणे जड आहे. मिताली रिटायर झाली तरी भारतासमोर नेतृत्वाचा प्रश्न नाही. टी-ट्वेन्टीची धुरा सांभाळणारी हरमनप्रीत कौर अन्य फॉरमॅटमध्ये कॅप्टनशीप स्वीकारण्यास सक्षम आहे. भारताकडे अनेक चांगले बॅटरही आहेत. पूजा वस्त्रकार आणि मेघना सिंग या ताज्या दमाच्या मध्यमगती गोलंदाजांमुळे मितालीची उणीव भासणार नाही. मुळात पुरुष असो किंवा महिला संघ, भारतात गुणवत्तेची कमी नाही. त्यामुळे पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटपटूंमध्येही अंतिम संघात जागा मिळवण्यासाठी चुरस आहे. आयसीसी वर्ल्डकप प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची ट्रॉफी उंचावण्यासाठी जगातील प्रत्येक संघ उत्सुक असतो. आशियामध्ये केवळ भारताचा पहिला संघ जगज्जेतेदाच्या ट्रॉफीजवळ पोहोचला होता. त्यामुळे भविष्यात वर्ल्डकप स्पर्धेवेळी भारताकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाईल. त्यामुळे ढेपाळलेल्या कामगिरीवर अधिक चर्चा करण्यापेक्षा बीसीसीआयने नव्या संघबांधणीला सुरुवात करावी. तसेच नव्या क्रिकेटपटूंना संधी द्यावी. यावेळच्या वर्ल्डकप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीतून भारताला खूप काही शिकण्यासारखे आहे, बोध घेण्यासारखे आहे. क्रिकेटपटू चुकांमधून धडा घेतील, अशी अपेक्षा आहे. खेळात हार-जीत असते. मात्र प्रत्येक वेळी हार आपल्याच वाट्याला येऊ नये, याची काळजी क्रिकेटपटूंनी घ्यावी, इतकेच सरतेशेवटी सांगावेसे वाटते.