मुंबई (प्रतिनिधी): मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने आता त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या सर्व मालमत्तांची माहिती मुंबई उपनगरच्या रजिस्ट्रारकडे मागितली आहे. यासंबंधी रजिस्ट्रारशी पत्रव्यवहारही केला आहे. नवाब मलिक, त्यांची पत्नी, मुलगा फराज यांच्या नावावर असलेल्या सर्व मालमत्तांसंबंधीची कागदपत्रे देण्यात यावीत, असे पत्रात नमूद केले आहे. ईडीने २४ मार्च रोजी हे पत्र पाठवले होते. दरम्यान, ईडीने यापूर्वी मलिक कुटुंबीयांकडे दस्तावेज मागितले होते. मात्र, ते न मिळाल्याने आता ईडीने रजिस्ट्रारकडे ही मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री मलिक यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
मलिक यांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर कोठडीत बिछाना, खुर्ची आणि घरचे जेवण मिळावे, अशा विनंतीचा अर्जही मलिक यांनी कोर्टात केला होता. त्यावर कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्याची विनंती मान्य करण्यात आली. तर घरचे जेवण मिळण्याबाबत मलिक यांचा वैद्यकीय अहवाल बघून निर्णय देऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.