मुंबई : मुंबई आणि उपनगरात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. त्यामुळे जागेचा अभाव जाणवत आहे. यावर उपाय म्हणून मुंबईतील प्रमुख १९ रेल्वे स्थानकांचा या प्रकल्पांतर्गत पुनर्विकास केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकमजली स्टेशन तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ९४७ कोटी रुपयांची पुनर्विकास योजना मंजूर करण्यात आली आहे.
या प्रकल्पांतर्गत १९ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली, नेरळ, शहाड, कसारा, जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या १२ स्थानकांचा समावेश आहे. तर पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, सांताक्रुझ, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई आणि नालासोपारा या सात स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने तयार केलेल्या आराखड्यानुसार पुढील १६ महिन्यांच्या आत हे काम पूर्ण होणार आहे. यात सध्याच्या वाहतुकीला अडथळा न आणता, दिलेल्या जागेचा योग्य वापर केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकासाठी तपशीलवार आराखडा तयार करून कार्यादेश देण्याचे आवाहन केले आहे.