पाटणा : बिहारची राजधानी पटना येथील दानापूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष दीपक कुमार मेहता यांची सोमवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. निवडणुकीच्या राजकारणातून ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय.
यासंदर्भातील माहितीनुसार, मेहता हे दानापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. यादरम्यान त्यांना धमक्याही येत होत्या. दीपक यांनी काही दिवसांपूर्वी होळी मिलन समारंभाचे आयोजन केले होते. यात जेडीयू नेते उपेंद्र कुशवाह आणि भाजपचे प्रमुख नेतेही सहभागी झाले होते. दीपक यांचे उपेंद्र कुशवाह यांच्याशी जवळचे संबंध होते. दरम्यान, दीपक यांनी दानापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली, तेव्हा एका गुंडाने त्यांना धमकी दिली होती. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडालीय.
गुन्हेगारांनी दीपकच्या डोक्यात एक, पोटात आणि फुफ्फुसात प्रत्येकी दोन गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेनंतर जेडीयूच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी दीपक मेहता यांच्या मारेकऱ्यांना लवकरात-लवकर अटक करण्याची मागणी केलीय. त्यांनी ट्विट करून म्हंटले आहे की, पक्षाचे नेते आणि दानापूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष दीपक मेहता यांची गुन्हेगारांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने मला खूप दुःख झालेय. पोलीस प्रशासनानं गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलेय.