नवी दिल्ली : विशिष्ट समाजातील महिलांची कथित बदनामी करणाऱ्या बुलीबाई ऍप प्रकरणातील आरोपी निरज बिष्णोई आणि सुली डील्स ऍप तयार करणारा ओंकांरेश्वर ठाकूर यांना दिल्ली कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. सदर आरोपींना जामीन मंजूर करताना न्यायालयाने सांगितले की, आरोपींनी या प्रकरणातील कोणत्याही साक्षीदाराला धमकावू नये, पुराव्यांसोबत छेडछाड करू नये या अटी ठेवल्या आहेत.
आरोपीने कोणत्याही पीडित व्यक्तीला संपर्क करणे, त्यांना आमिष दाखवण्याचाही प्रयत्न करू नये अशा स्पष्ट सूचना कोर्टाने दिल्या आहेत. जामीनावर असताना आरोपीने आपला संपर्क क्रमांक आणि वास्तव्याची माहिती अधिकाऱ्याला द्यावी. आरोपी आपला फोन कायम सुरू ठेवणार, तसेच आपल्या ठावठिकाण्याची माहिती देईल. आरोपीने देश सोडू नये आणि प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर रहावे लागणार. जामिनावर असताना आरोपीने असा गुन्हा करू नये असेही आरोपींना बजावण्यात आले आहे.
सुली हा विशिष्ट समाजाच्या महिलांबद्दल वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे. गेल्या 4 जुलै 2021 रोजी ट्विटरवर सुली डील्सच्या नावाने अनेक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले. ऍपवर ‘सुली डील ऑफ द डे’ अशी टॅगलाईन वापरण्यात आली होती आणि ती विशिष्ट महिलांच्या फोटोंसोबत शेअर केली जात होती. हे फोटोही ‘गिटहब’ अॅपवर एका अज्ञात ग्रुपने तयार केले होती. या प्रकरणी तक्रारही करण्यात आली होती, मात्र अनेक महिने त्यावर कारवाई झाली नव्हती.