Sunday, August 31, 2025

शरद पवारांचे आडनाव बदलून 'आगलावे' करा

शरद पवारांचे आडनाव बदलून 'आगलावे' करा

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप असा वाद पेटत असताना आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर टीका केली आहे. शरद पवारांचं नाव आता आगलावे करावं, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

'शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी राज्यामध्ये काड्या करण्याशिवाय काहीही काम केलं नाही. जाईल तिथे आग लावायची. त्यांचं आयुष्य आग लावण्यामध्येच गेलं. म्हणून त्यांचं आडनाव बदलून आगलावे ठेवावं' अशी सडकून टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

इतकंच नाहीतर तर पवारांचं आडनाव आगलावे केल्याने महाराष्ट्रात होरपळणारी आग शांत होईल, असंही खोतांनी म्हटलं आहे. खरंतर, त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राष्ट्रवादीतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'येड्यांच्याच मागे ईडी लागल्याची राज्याची स्थिती आहे. जे सज्जन आहेत त्यांना काहीही त्रास नाही. ईडीच्या धाडी या शहाण्या-सज्जनांच्या घरी पडत नाहीत. हे येडे आहेत म्हणून येड्याच्या घरी धाडी पडतात'. तर शेतकऱ्यांना वीज बिल मागाल तर दांडक्याने सोलून काढू. तुम्हाला आता संपूर्ण वीजबिल माफ करावं लागेल, असा इशाराही यावेळी खोतांनी दिला.

Comments
Add Comment