राजापूर, रत्नागिरी : कोकणात पुन्हा एकदा नाणार रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे युवानेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज राजापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीत बॅनर युद्ध भडकले आहे.
आदित्य ठाकरे राजापूरचा दौरा करणार असल्याने तालुक्यातील पश्चिम भागात रिफायनरी प्रकल्पावरून बॅनरबाजी दिसून येत आहे. रिफायनरीच्या बाजूने आणि रिफायनरीच्या विरोधात अशा दोन्ही बाजूने रस्त्यांवर बॅनर लावण्यात आले आहेत. राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी आणू नका, अशी विनंती आदित्य ठाकरे यांना बॅनरमधून नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे खारेपाटणपासून राजापूरपर्यंत स्वागताचे बॅनर लावले आहेत. रस्त्यांवर अशा प्रकारे समर्थनाचे आणि विरोधाचे बॅनर लावलेले दिसत आहेत.
नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाला विरोध झाल्याने तो कोकणात इतर ठिकाणी हलविण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्यात दौऱ्यावर आले आहेत. नागरिकांमधून रिफायनरिला विरोध आणि समर्थन देखील दिसून येत आहे. यामुळे शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
राजापूरमध्ये आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प समर्थकांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी महिला समर्थकांशी संवाद साधत त्यांची मतं जाणून घेतली. महिलांच्या प्रश्नांना आदित्य ठाकरेंनी उत्तरही दिले. आदित्य ठाकरे यांनी रिफायनरी समर्थकांची भेट घेतली आणि त्यांचे निवेदन स्वीकारले आहे.