Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीआसाम- मेघालयमधील सीमावाद संपुष्टात

आसाम- मेघालयमधील सीमावाद संपुष्टात

अमित शहांनी घडवून आणला ऐतिहासिक करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाम आणि मेघालय या ईशान्येकडील दोन राज्यांत गेल्या ५० वर्षांपासून सीमावाद कायमचा संपुष्टात आला आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांमध्ये मंगळवारी ऐतिहासिक करार करण्यात आला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांची या कराराला सहमती झाली असून याद्वारे एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. विवादमुक्त ईशान्य भारत हे आमचे लक्ष्य असून त्यासाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक असल्याची भावना यावेळी अमित शहा यांनी व्यक्त केली.

आसामनचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि कॉनराड संगमा यांनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली व सीमावाद निकाली काढण्यासाठी करार करण्यात आला. या करारावर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून अमित शहा यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. या कराराबाबत शहा यांनीच अधिक माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ईशान्य भारत विवादमुक्त बनवून तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सातत्याने केले आहेत. त्यादृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. ईशान्येकडील राज्यांत शांततेसोबतच विकास, समृद्धी आणि सांस्कृतिक वारसा यास अग्रक्रम दिला जाणार असून त्या प्रयत्नांना आज मोठे यश मिळाले आहे, असे शहा म्हणाले. आसाम आणि मेघालय या राज्यांत गेल्या ५० वर्षांपासून सीमावाद धुमसत आहे. हा वाद आता कायमचा मिटेल असा मला विश्वास आहे. एकूण सीमेचा विचार केल्यास ७० टक्के सीमा आज वादमुक्त झाली आहे. वादाचे एकूण १२ मुद्दे आहेत. त्यातील ६ मुद्द्यांवर मंगळवारी तोडगा काढण्यात आला आहे. उरलेल्या सहा मुद्द्यांबाबत चर्चेतून तोडगा काढला जाईल. नजीकच्या भविष्यात वादाचे सर्व मुद्दे निश्चितपणे निकाली निघतील, असेही शहा म्हणाले.

ऐतिहासिक करारानंतर संगमा आणि हेमंत बिस्वा सरमा यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ज्या मुद्द्यांवर वाद आहे त्यावर आम्ही आपसात चर्चा करून मार्ग काढू, असे संगमा म्हणाले तर पुढच्या टप्प्यातील चर्चा लवकरच सुरू केली जाईल. येत्या सहा-सात महिन्यांत वादाचे उर्वरित सहा मुद्दे निकाली काढले जातील, असे सरमा यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -