नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सब-व्हेरिएंट असलेल्या बीए.टू विषाणूने जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे.
युरोपमध्ये या व्हेरिएंटने बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या व्हेरिएंटच्या प्रादुर्भावामुळे रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली असल्याचं फ्रान्सकडून सांगण्यात आलं आहे, तर जर्मनीमध्ये मागील २४ तासांत ३ लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसंच अमेरिकेतही याच बीए.टू विषाणूने बाधित रुग्णांची संख्या ३३ टक्के एवढी झाली आहे. अमेरिकेत शनिवारी जवळपास ४० हजार नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णसंख्येत अचानक झालेला वाढीला बीए.टू व्हेरिएंट कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता ४८ कोटींहून अधिक झाली आहे. युरोपमध्ये मागील काही दिवसांपासून चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून कोरोना प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. इंग्लंड, स्कॉटलंड आणि इतर काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचं फ्रान्सच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.