नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून रविवारी देशवासीयांशी साधलेल्या संवादामध्ये देशाने साध्य केलेल्या निर्याती लक्ष्याचे कौतुक करताना भारतीय वस्तूंची वाढती मागणी हीच ‘मेक इन इंडिया’ची ताकद असल्याचे आवर्जून सांगितले. ‘मन की बात’ कार्यक्रमाचा हा ८७वा भाग होता. गेल्या आठवड्यात आपण ४०० अब्ज डॉलर्स म्हणजे ३० लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य केले. पहिल्यांदा हे ऐकल्यावर असं वाटेल की, ही तर अर्थव्यवस्थेशी संबंधित गोष्ट आहे. मात्र ही अर्थव्यवस्थेपेक्षाही, भारताचे सामर्थ्य, भारताच्या क्षमतेशी संबंधित बाब आहे. एक काळ असा होता, जेव्हा भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा देखील १०० अब्ज, कधी २०० अब्ज इतका राहत असे. मात्र आज भारताची निर्यात, ४०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. याचा एक अर्थ असा आहे की, जगभरात भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांची मागणी वाढते आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की भारताची पुरवठा साखळी व्यवस्था देखील दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे, असे मोदी म्हणाले.
निर्यातीच्या क्षेत्रात भारताच्या यशाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, हिमाचल, उत्तराखंडमध्ये उत्पादित धान्याची पहिली खेप डेन्मार्कला निर्यात करण्यात आली. आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि चित्तूर जिल्ह्यांतील बंगनापल्ली आणि सुवर्णरेखा आंबे दक्षिण कोरियाला निर्यात करण्यात आले. ही यादी खूप मोठी आहे आणि ही यादी जितकी मोठी असेल तितकी मेक इन इंडियाची ताकद जास्त असेल, भारताची ताकद जास्त असेल आणि त्याच्या क्षमतेचा आधार असेल. आमचे शेतकरी, आमचे अभियंते, छोटे उद्योजक, आमचे एमएसएमई क्षेत्र, विविध व्यवसायातील लोक, हे सर्व तिची खरी ताकद आहे, असे मोदी यांनी म्हटले.
जेव्हा एक – एक भारतीय, लोकल करता व्होकल होतो, म्हणजे स्थानिक उत्पादनांचा जगभर प्रचार करतो, तेव्हा लोकलला ग्लोबल व्हायला वेळ लागत नाही. आपल्या उत्पादनांची प्रतिष्ठा आणखी वाढवू या, असे आवाहन मोदी यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा
मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये मराठी भाषा गौरव दिनावर बोलताना सर्व मराठी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी देखील काही लोक मानसिक द्वंदात आहेत. त्यामुळे त्यांना आपली भाषा, आपला पोशाख, आपली खाद्यसंस्कृती यांबाबत संकोच वाटतो. खरं तर जगात असं कोठेही दिसत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांच्या स्वच्छतेच्या कामाची दखल
पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये बोलताना नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांच्या स्वच्छतेच्या कामाची दखल घेत कौतुक केले आहे. चंद्रकिशोर पाटील गोदावरी नदीच्या काठावर उभे राहून लोकांनी नदीत कचरा टाकू नये म्हणून प्रयत्न करतात. यासाठी ते दिवसभरातील खूप वेळ खर्च करतात. आरोग्याचा थेट संबंध स्वच्छतेशी जोडलेला आहे. त्यांचा स्वच्छतेचा संकल्प खूप दृढ आहे, असे मोदी म्हणाले.