पणजी : प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला असून प्रमोद सावंत यांच्यासह इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह इतर अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
गोवा विधानसभा निवडणुकीत ४० जागांपैकी २० जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर ३ अपक्ष आमदारांनीही समर्थन दिल्याने भाजपच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मात्र मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली होती. कारण विश्वजीत राणे हेदेखील मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत होते. मात्र अखेर भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
प्रमोद सावंत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ विश्वजीत राणे, मौविन गोडिण्डो, रवी नायक, निलेश कॅबराल, सुभाष सिरोडकर, रोहन खुंटे, गोविंद गौडे, अतानासियो मोनसेराते यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि इतर स्थानिक पक्षांनी भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. मात्र गोव्याची सत्ता पुन्हा काबीज करण्यात भाजपने यश मिळवलं. या निवडणुकीत भाजपला २०, काँग्रेसला ११, ‘आप’ला २, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ३ आणि अपक्षांना ३ जागा मिळाल्या.