नवी दिल्ली : यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान एक विचित्र घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ याने स्टेजवर जाऊन सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नेमक काय घडलं?
सुत्रसंचालन करणारा क्रिस रॉक स्टेजवर डॉक्यूमेंटरी फीचरसाठी ऑस्कर पुरस्कार जाहीर करण्यासाठी आला होता. याच दरम्यान रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ हिच्या केसांबद्दल खिल्ली उडवली. यामुळे स्मिथला प्रचंड राग आला आणि तो थेट स्टेजवर गेला आणि क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. तसेच विल स्मिथने तू माझ्या पत्नीचे नाव तुझ्या तोंडून पुन्हा घेऊ नकोस, असा इशाराही दिला.
विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ ही आलोपेसिऍ (Alopecia) नावाच्या आजाराने त्रस्त असून या आजारामुळे डोक्यावर टक्कल पडते. त्यामुळे तिच्या डोक्यावर केस नाहीत. अशा परिस्थितीत क्रिस रॉकने जॅडा स्मिथच्या केसांबद्दल खिल्ली उडवल्याने ते स्मिथला अजिबात आवडले नाही. विल स्मिथला प्रचंड राग आला आणि स्मिथ थेट स्टेजवर गेला आणि क्रिस रॉकच्या कानाखाली जाळ काढला.