‘ड्यून’ चित्रपटाला सर्वाधिक ६ पुरस्कार
रशिया-युक्रेन युद्धातील मृत्यूमुखींना श्रद्धांजली
लॉस एंजेलिस : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘ड्यून’ चित्रपटाने सर्वाधिक ६ पुरस्कारांवर नाव कोरले. ‘किंग रिचर्ड’ या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेता, ‘The Eyes of Tammy Faye’ या चित्रपटासाठी जेसिका चेस्टेन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘कोडा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळाला. यावेळी ‘कोडा’ या चित्रपटाच्या संपूर्ण चमूमधील कलाकारांना स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले. यासोबतच सर्वोत्कृष्ट माहितीपट श्रेणीत ‘द समर ऑफ सोल’ने ऑस्कर पुरस्कार पटकावला. यंदा या पुरस्काराचे ९४ वे वर्ष होते. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. या सोहळ्यात रशिया आणि युक्रेनमधील युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांसाठी मौन पाळण्यात आले.
यंदा ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातील दोन मोठे चित्रपट पाठविण्यात आले होते. एक सूर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मराक्कर’ हे सिनेमे ऑस्करच्या शर्यतीत होते, मात्र, अंतिम नामांकनांच्या यादीतून हे दोन्ही चित्रपट शर्यतीतून बाहेर पडले होते.
दरम्यान वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘ड्यून’ चित्रपटाने सहा पुरस्कारांची कमाई केली. यामध्ये ‘सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग’, ‘सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर’, ‘सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन’, ‘सर्वोत्कृष्ट साउंड’, ‘सर्वोत्कृष्ट व्हिजुअल इफेक्ट’, ‘सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी’ पुरस्कारांचा समावेळ आहे. तर ट्रॉय कोत्सुर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ५३ वर्षीय ट्रॉय यांचा हा पहिला ऑस्कर असून पुरस्कार स्विकारताना ते भावूक झाले होते.
विविध क्षेत्रातील पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट – कोडा (CODA)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – जेसिका चेस्टेन, द आईज ऑफ टॅमी फाये (The Eyes of Tammy Faye)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – विल स्मिथ, किंग रिचर्ड (King Richard)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – जेन कॅम्पियन, द पॉवर ऑफ द डॉग (The Power of the Dog)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं – नो टाइम टू डाय, नो टाइम टू डाय (No Time to Die) बिली एलिश आणि फिनिज ओकॉनेल यांनी दिलं संगीत
सर्वोत्कृष्ट माहितीपट फिचर – समर ऑफ सोल Summer of Soul (…Or, When the Revolution could not be televised)
सर्वोत्कृष्ट अडाप्टेड स्क्रिनप्ले – शियान हेडर (CODA)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रिनप्ले – केनेथ ब्रनाघ लिखित बेलफास्ट (Belfast)
सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइन – जेनी बीवन (क्रुएला)
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर – ड्राइव्ह माय कार (जपान)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अॅरिएना डीबोस, वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ट्रॉय कोत्सुर (CODA)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर – एन्कँटो (Encanto)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर – हान्स झिमर, ड्युन (Dune)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – ग्रेग फ्रेजर, ड्युन (Dune)
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – ड्युन, पॉल लॅम्बर्ट, त्रिस्टान माइल्स, ब्रियान कॉनर, गर्ड नेफ्झर (Dune)
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग – जो वॉकर, ड्युन (Dune)
सर्वोत्कृष्ट साऊंड – मॅक रुथ, मार्क मांगिनी, थिओ ग्रीन, डग हेम्फिल, रॉन बार्लेट (Dune)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन – पॅट्रिस वर्मिट, शुशाना सिपॉस (Dune)
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग – द आइज ऑफ टॅमी फाये, लिंडा डॉड्स, स्टेफनी इन्ग्राम, जस्टीन राले (The Eyes of Tammy Faye)
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट – द लाँग गुडबाय (The Long Goodbye)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट – द विंडशिल्ड पायपर (The Windshield Piper)
सर्वोत्कृष्ट माहितीपट शॉर्ट – द क्वीन ऑफ बास्केटबॉल (The Queen of Basketball)
अन्य वैशिष्ट्ये
हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली.
ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाचा समावेश आहे.
जेन कॅम्पियन यांना ‘द पॉवर ऑफ द डॉग’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. या श्रेणीत पॉल थॉमस अँडरसन, केनेथ ब्रानाघ, स्टीव्हन स्पीलबर्ग, रुसुके हामागुची यांनाही नामांकन मिळाले होते.
यंदाच्या वर्षी जेम्स बाँडला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या खास प्रसंगी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जेम्स बाँडच्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
जेम्स बाँडच्या ‘नो टाइम टू डाय’ या गाण्यासाठी बिली एलिशला सर्वोत्कृष्ट मूळ गायकाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. बिलीचा हा पहिलाच अकादमी पुरस्कार आहे.
प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळालेला चित्रपट म्हणून जॅक स्नायडरच्या ‘आर्मी ऑफ द डेड’ ची निवड ऑस्कर पुरस्कारासाठी करण्यात आली.
सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत ‘द समर ऑफ सोल’ने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले.बेस्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार हंस झिमर यांना मिळाला आहे. ड्यून या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.
बेस्ट अॅडॉप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार शॉन हेडर यांना मिळाला आहे. त्यांना कोडा या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला. यावेळी ते फार भावूक झाले
‘द लाँग गुडबाय’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार मिळाला. अनिल कारिया यांच्यासह या चित्रपटाचे लेखन रिझ यांनी केले आहे.केनेथ ब्रानाघ निर्मित बेलफास्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले ऑस्कर पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार क्रुएला चित्रपटासाठी जेनी बेवन यांना मिळाला.
‘ड्राइव्ह माय कार’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ड्राईव्ह माय कार, फ्ली, द हँड ऑफ गॉड, लुनाना : अ याक इन द क्लासरूम, द वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड यांना देखील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले होते.
अभिनेत्री अॅरियाना डीबोसला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘वेस्ट साइड स्टोरी’ चित्रपटातील अभिनयासाठीत तिला हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात तिने अनिता नावाच्या पात्राची भूमिका साकारली होती.
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअर स्टाइलसाठी देण्यात येणारा ऑस्कर ‘द आय ऑफ टॅमी फेय’ला मिळाला.
रॉबर्ट अल्टमॅन यांची निर्मिती असलेल्या ‘दी लाँग गुडबॉय’ला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म पुरस्कार मिळाला.
‘अकादमी पुरस्कार’ खास ओळख
ऑस्कर पुरस्काराला ‘अकादमी पुरस्कार’ या नावानेही ओळखले जाते.चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.अमेरिकेतील ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो.१९२७ मध्ये स्थापन झालेल्या या अकादमीचे उद्दिष्ट हे मोशन पिक्चर्सच्या कला आणि विज्ञानांची प्रगती करणे असा आहे.
स्पर्धेत भारतीय चित्रपटांचा ठसा, बहुतांश मराठी दिग्दर्शक
ऑस्करच्या स्पर्धेत आजवर अनेक भारतीय चित्रपटांनी आपला ठसा उमटवला आहे. काहींनी स्वत:हून नामांकन मिळवली, तर काहींनी देशातर्फे प्रतिनिधीत्व केले. यातील बहुतांश चित्रपटांची निर्मिती मराठी दिग्दर्शकांनी केली होती. २००१ साली आशुतोष गोवारीकर यांनी ‘लगान’ चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट ऑस्कर स्पर्धेतील अंतिम पाच सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत पोहोचला होता. हिंदीत ‘लगान’ने इतिहास रचला आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती मराठीत संदिप सावंत यांच्या ‘श्वास’ या चित्रपटाने केली. अमोल पालेकर (पहेली) – २००५ साली प्रदर्शित झालेला ‘पहेली’ हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडला गेला होता. या चित्रपटाला नामांकन मिळाले नाही, मात्र एका मराठी दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट ऑस्करसाठी जाणे हे बाब मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच कौतुकाची होती. परेश मोकाशी या दिग्दर्शकाने हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटातून पदार्पण केलं आणि थेट ऑस्करवारी केली.