औरंगाबाद : पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदला आहे. हवामान खात्याने आज बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
२९ मार्चनंतर राज्यात उष्णतेची दाहकता आणखी वाढण्याची शक्यता आहे. २९ आणि ३० मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उष्णतेची लाट धडकणार आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
३१ मार्च रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. तर जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी या सहा जिल्ह्यांत उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे.