
सीमा दाते
मुंबई महापालिका ही आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून लौकिक. काही महिन्यांतच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्या आधीच मुंबईत मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडीना वेग आला आहे. मातोश्रीच्या निकटवर्तीयांवर जाणाऱ्या कारवाईंमुळे शिवसेनेची आर्थिक कोंडी होऊन याचा परिणाम निवडणुकीत शिवसेनेवर होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत पहारेकरीची भूमिका निभावलेल्या भाजपकडून महापालिकेवर आणि शिवसेनेवर आरोप होत होते. मात्र त्याच आरोपानंतर आता आयटी विभागदेखील सक्रिय झाला आहे. शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या जवळच्या असलेल्या बड्या नेत्यांवर आता आयटी आणि ईडीची कारवाई व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र निवडणुकीच्या आधीच शिवसेनेची आर्थिक कोंडी होत आहे का? असा प्रश्न उभा राहतो आहे.
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले अनिल परब, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, आदित्य ठाकरे यांचे मित्र राहुल कनल, आमदार रवींद्र वायकर, त्यानंतर मेहुणे श्रीधर पाटणकर आणि त्यांचे साथीदार नंदकिशोर चतुर्वेदी या सगळ्यांमुळे अडचणीत वाढ झाली आहे. एकापाठोपाठ एक केंद्रीय यंत्रणांकडून धाडसत्र सुरू आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या तोंडावर ही कारवाई सुरू झाली आहे का? असे बोलले जाते.
गेली ३० वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच २०१७ मध्ये अवघ्या काही फरकाने भाजपच्या हातून सत्ता गेली होती. मनसेतून काही नगरसेवक शिवसेनेत आल्याने शिवसेनेचे संख्याबळ वाढले आणि शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर स्थापन झाली. मात्र भाजपने पहारेकऱ्यांची भूमिका घेतली आणि पाच वर्षे हीच भूमिका भाजपने चांगलीच निभावली. गेल्या पाच वर्षांतील मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पाळंमुळं भाजपच्या नेत्यांकडून बाहेर काढण्यात सुरू झाली आणि त्यानंतर शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली. सगळ्यात आधी ४ वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेल्या यशवंत जाधव यांच्यावर कारवाई सुरू झाली, इतकेच नाही तर पालिका आयुक्तांना देखील आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी तर पालिका आयुक्त इक्बल सिंह यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. इक्बाल सिंग चहल यांनी अमेरिकेत मालमत्ता खरेदी केली असल्याचा आरोपही कंबोज यांनी केला आहे तर स्थायी समितीत जेवढे प्रस्ताव जातात, त्याचा अजेंडा आयुक्त लावतात. स्थायी समितीचा अजेंडा सेट करण्याचं काम आयुक्ताचं आहे. असा आरोप ही कंबोज यांनी आयुक्तांवर केला आहे.
विशेष म्हणजे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींपैकी चार राज्यांत भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली हे नक्की. यामुळे मुंबई महापालिकेसाठी भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातच मिशन १३४ अधिकचा नारा भाजप नेते आशीष शेलार यांनी दिला आहे, तर मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. २०१७ मध्ये हातातून गेलेली सत्ता या आगामी महापालिका निवडणुकीत मिळावी म्हणून भाजपने तयारी केली आहे, गेली इतके वर्षे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या विरोधात भाजप पाहायला मिळत आहे. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेना - ९९, भाजप - ८३, काँग्रेस - ३०, राष्ट्रवादी - ८, समाजवादी पार्टी - ६, मनसे - १, एमआयएम - २ असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांचा विचार करता अगदी काहीच फरकाने भाजपकडून सत्ता हुकली. मात्र आता तसे न करता भाजपची वाढलेली ताकद पाहता कोणत्याही परिस्थितीत भाजप सत्ता मिळवणार असे दिसत आहे. त्यातच भ्रष्टाचारामुळे शिवसेनेची झालेली गोची पाहता आगामी महापालिका निवडणुकीवर शिवसेनेच्या मतसंख्येवर परिणाम होईल, असे दिसत आहे. आधीच महाविकास आघाडी केल्यामुळे शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडला की काय असा प्रश्न आधीच मतदारांना पडलाय. त्यामुळे एकीकडे आर्थिक गोची, भ्रष्टाचाराचे आरोप या सगळ्यांचे परिणाम शिवसेनेला निवडणुकीत भोगावे लागतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याउलट भाजप आधीच अॅक्शन मोडमध्ये आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आधीपासूनच तयारी करून ठेवली असून मुंबईसाठी महत्त्वाच्या नेत्यांवर जबाबदारी दिली आहे. आमदार नितेश राणे, प्रसाद लाड, आशीष शेलार, अतुल भातखळकर यांसारखे मोठे चेहरे सध्या उतरले आहेत. लोकांमध्ये जाण, संवाद साधणं, समस्या सोडवणं ही सगळी कामे या नेत्यांकडून केली जाऊन घराघरांपर्यंत भाजप पोहोचत आहे. इतकेच नाही तर महापालिकेत होत असलेल्या गैरव्यवहारांना देखील यांनी बाहेर काढल्यामुळे या निवडणुकीत भाजपकडे मतदारांचा कौल जाण्याची
शक्यता आहे.
seemadatte@@gmail.com