Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमीआधी रामाच्या नावाने मतं मागितली, आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का?

आधी रामाच्या नावाने मतं मागितली, आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का?

उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला

मुंबई : दाऊद कुठे आहे हे कुणालाच माहिती नाही. आधी यांनी रामाच्या नावावर मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला आहे. ते आज विधीमंडळात बोलत होते. नवाब मलिक यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना माहिती पुरवली. फडणवीस यांचे कौशल्य पाहता केंद्र सरकारने त्यांना रॉ किंवा सीबीआयमध्ये घेतले पाहिजे. जेणेकरून ही कामे अधिक वेगाने होतील, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या सर्व आरोपांना उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत चोख प्रत्युत्तर दिले.

मी टीकेला किंवा बदनामीला घाबरत नाही. पण बदनामी करताना ती कोणत्या थराला जाऊन करावी? नवाब मलिक हे दोषी असतील तर त्यांच्यावर जरूर कारवाई करू. पण आरोप करताना ते एवढ्या थराला जाऊन केले जातात की कधीकधी तथ्यहीन आरोपही सत्य वाटायला लागतात. नवाब मलिक हे दाऊदचे हस्तक असल्याचे सांगितले जाते. पण केंद्रीय तपास यंत्रणा इतक्या पोकळ आहेत का, दाऊदचा हस्तक इतके वर्षे देशात फिरतोय, निवडून येतोय आणि केंद्रीय यंत्रणांना त्याचा पत्ताही लागत नाही. केंद्रीय यंत्रणा फक्त थाळ्या वाजवणे आणि दिवे पेटवण्याचे काम करतात का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

एखादा तिरंदाज बाण सोडतो तेव्हा लक्ष्यभेद करण्यासाठी त्याला कौशल्य पणाला लावावे लागते. केंद्रीय तपास यंत्रणा या म्हणजे बाण आहेत. सध्या हे बाण सोडले जात नाही, तर ते आपल्याला हवे त्या लक्ष्यावर आणून खुपसले जात आहेत. नवाब मलिक यांच्याबद्दलची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ईडीला दिली. म्हणजे ईडी इतक बेक्कार आहे का त्यांना काहीच माहिती नाही. द्या माहिती द्या, कोणाला ठोकायचंय, द्या ठोकतो, असा त्यांचा कारभार आहे का? म्हणजे माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्हीच, चौकशी करणारे तुम्हीच आणि शिक्षा देणारेही तुम्हीच असता. कारण अशा कडक केसेस तयार करून दिल्यावर न्यायालय तरी काय करणार? आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे पण सर्व यंत्रणा अशा राबवल्या तर काय होणार? ती ईडी आहे की घरगडी आहे, असा प्रश्न आता निर्माण झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

दाऊदला घरात घुसून मारा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “भाजपने आधी रामाच्या नावाने मतं मागितली. आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? मग तो दाऊद आहे कुठं हे कुणालाच माहिती नाही. ओबामाने ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का? निवडणुकीत त्याचा वापर केला होता का? ओबामांनी ओसामाला त्याच्या घरात घुसून मारलं हा मर्दपणा. जा घुसा आणि त्या दाऊदला मारा, याला म्हणतात मर्दपणा.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “आज तुम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागताय. पण अफजल गुरूला फाशी देण्याची वेळ आली त्यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी फाशी देऊ नका असं त्या म्हणाल्या होत्या. मग त्याच मुफ्तीसोबत सत्तेत भाजप बसले. बुऱ्हान वाणीला मारल्यानंतर त्या घरी गेल्या होत्या. अशा लोकांसोबत तुम्ही सत्तेचा सारीपाठ मांडला होता.”

पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सगळे भ्रष्टाचारी आणि दाऊदची माणसं आहोत असं विरोधक म्हणतायंत. पण पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -