Thursday, May 15, 2025

महामुंबईताज्या घडामोडीराजकीय

नंदकिशोर चतुर्वेदीचा मनसुख हिरेन तर झाला नाही ना?

नंदकिशोर चतुर्वेदीचा मनसुख हिरेन तर झाला नाही ना?

मुंबई : श्रीधर पाटणकर प्रकरणातील हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याची मनसुख हिरेनप्रमाणे हत्या तर झाली नाही ना, असा खळबळजनक सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. मी गेल्या वर्षभरापासून ट्विटच्या माध्यमातून नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याविषयी प्रश्न विचारत आहे. चतुर्वेदी नेमके कुठे गेले, त्यांना कोणी गायब केले, हे प्रश्न मी वारंवार विचारले आहेत. माझी ट्विटस त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली असतील आणि मी काही खोटं बोलत असेल तर त्यांनी माझ्याविरुद्ध कारवाई करावी, असेही मी म्हटले होते. मात्र, त्यानंतरही नंदकिशोर चतुर्वेदी ही व्यक्ती समोर आली नाही. त्यामुळे त्याचा मनसुख हिरेन तर झाला नाही ना, अशी शंका नितेश राणे यांनी व्यक्त केली. ते बुधवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


यावेळी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचाही नंदकिशोर चतुर्वेदीशी संबंध आहे का, असा सवाल उपस्थित केला. २०१४ मध्ये आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीज नावाची कंपनी सुरु केली होती. २०१९ पर्यंतची या कंपनीची कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यानंतर ही कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी याच्याकडे गेली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेहुणाच नव्हे तर पत्नी आणि मुलाचाही आर्थिक व्यवहारांशी संबंध आहे का, हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.


ईडीने श्रीधर पाटणकर यांच्यावर आरोप नव्हे तर कारवाई केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांत राहून संशय आणखी वाढवू नये. त्यांनी समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरून नंदकिशोर चतुर्वेदी याचा मनसुख हिरेन किंवा जया जाधव तर झाला नाही ना, हे समजू शकेल, असे नितेश राणे यांनी म्हटले. त्यामुळे आता शिवसेना या आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.


श्रीधर पाटणकर प्रकरणातील महत्त्वाचा सूत्रधार नंदकिशोर चतुर्वेदी अद्याप फरार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईच्या भीतीने नंदकिशोर चतुर्वेदीने देशातूनच पळ काढला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


नंदकिशोर चतुर्वेदी हा एक हवाला ऑपरेटर असून तो अनेक बोगस कंपन्या चालवायचा. यापैकीच एका कंपनीतून श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विनातारण कर्ज देण्यात आल्याची माहिती ईडीच्या कागदपत्रांमधून समोर आली आहे.

Comments
Add Comment