नवी दिल्ली : या आर्थिक वर्षात कोविड महामारीच्या सावटाखालीही भारताने ४०० अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याच्या विक्रमी निर्यातीचे लक्ष्य गाठल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. आत्मनिर्भर भारत योजनेमुळे आपण हे लक्ष्य गाठले असून हे आपले मोठे यश असल्याचे यावेळी मोदी म्हणाले.
आपली ही आतापर्यंतची सर्वात जास्त निर्यात असून ३१ मार्चच्या ठरवलेल्या तारखेच्या नऊ दिवस आधीच हे लक्ष्य साधले गेले याबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला. मागील आर्थिक वर्षात ही निर्यात २९२ अब्ज डॉलर एवढी होती, या वर्षी त्यात ३७ टक्के वाढ झाली आहे. या यशाबद्दल शेतकरी, उद्योजक, उत्पादक व निर्यातदार आदींचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले.
मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करून वरील माहिती दिली आहे. हे ध्येय गाठण्यासाठी सरकारने राज्य सरकारांशी अगदी जिल्हा पातळीपर्यंत सुसंवाद ठेवला, निर्यातदारांच्या समस्या जाणून त्या त्वरेने सोडविण्यावर भर दिला, निर्यातीस प्रोत्साहन देणाऱ्या उद्योग संघटनांबरोबरही संपर्क ठेवला व त्याचमुळे हे उद्दिष्ट गाठले गेले. वर्षभर सरासरी रोज एक अब्ज डॉलर मूल्याची व दरमहा ३३ अब्ज डॉलरची निर्यात झाल्याचे ते यात म्हणाले.
पेट्रोलियम उत्पादने, इंजिनिअरिंग साहित्य, चामड्याच्या वस्तू, कॉफी, प्लास्टिक, तयार कपडे, मांस, मासे व दुग्धजन्य पदार्थ, तंबाखू याची प्रामुख्याने निर्यात झाली. या वर्षातही कोविडमुळे वाहतुकीवर आलेल्या मर्यादा, कंटेनरचा तुटवडा, वाहतुकीच्या दरात झालेली प्रचंड वाढ व खेळत्या भांडवलाची कमतरता या सर्वांवर मात करून आपण गाठलेले लक्ष्य उल्लेखनीय आहे, असे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक अजय सहाय म्हणाले.