मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत कोरोना काळातील घोटाळ्यांची जंत्री मांडत ठाकरे सरकारची पुरती कोंडी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेचा कारभार, आरोग्य व्यवस्था आणि कोव्हिड सेंटर्समधील भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर तपशीलवार भाष्य केले. मुंबईतील कोव्हिड सेंटर्सची कंत्राटे आरोग्य क्षेत्रातील नामांकित संस्थांना न देता राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कंपन्यांना देण्यात आली. या कंपन्यांना अशाप्रकारचा कामाचा कोणताही अनुभव नव्हता. अनेक कोव्हिड सेंटर्समध्ये एकही रुग्ण आला नसला तरी संबंधित कंपन्यांना ५० टक्के पैसे देण्यात आले. प्रेतावरच्या टाळुवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार मुंबईतील मराठी आणि अमराठी माणसांच्या लक्षात आला आहे. मुंबई मेली तरी चालेल पण सत्ताधाऱ्यांकडून आपलं घर भरणं सुरूच आहे, अशी जळजळीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
लाईफलाईन मॅनेजमेंट हॉस्पिटस सर्व्हिसेस या कंपनीला पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचे कंत्राट मिळाले होते. मात्र, १५ दिवसांत त्यांची हकालपट्टी झाली. त्यानंतर याच कंपनीला मुंबईतील पाच कोव्हिड सेंटर्सची कंत्राटे देण्यात आली. मुलुंड कोव्हिड सेंटरचे कंत्राटही असेच तडकाफडकी देण्यात आले. कंत्राट मिळवताना आशा कॅन्सर ट्रस्ट अँण्ड रिसर्च सेंटरचे लेटरपॅड सादर करण्यात आले. मात्र, या संस्थेची माहिती घेतली तेव्हा प्रत्यक्षात अशी कोणतीही संस्था नोंदणीकृत नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच या संस्थेने जो जीएसटी क्रमांक दिला होता तोदेखील एका डिपार्टमेंटल स्टोअरचा होता. ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्यांबाबतही असाच गोंधळ पाहायला मिळाला. यापैकी तीन कंपन्या काळ्या यादीत होत्या. कोरोना काळात इतके भयानक घोटाळे झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
‘महाविनाश, महावसुली आणि मद्यविक्री आघाडी’
मविआचा अर्थ महाविनाश, महावसुली आणि मद्यविक्री आघाडी असा आहे. खूप दूरगामी विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता. कोरोना काळात मंदिरे बंद असताना बार सुरु होते. सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केला नाही. पण बार नुतनीकरणासाठीचे शुल्क कमी केले. चंद्रपूरातील दारुबंदी उठवण्यात आली. ज्या अनिल अवचट यांनी व्यसनमुक्तीसाठी आयुष्य वेचले त्यांचे निधन झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी सकाळी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याच दिवशी दुपारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी वाइन विक्रीचा निर्णय घेतला, असे सरकार सांगते. सरकारला शेतकऱ्यांना मदत करायची होती तर प्रतिहेक्टर ५० हजार रुपये देण्याची जी घोषणा केली होती, ते पैसे शेतकऱ्यांना द्यावेत. तसेच इतर शेतीपुरक उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
तेच मूर्ख तेच शहाणे…
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !! माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन, तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासुन रात्रीपर्यंत तेच ते तेच ते …’ या विंदा करंदीकर यांच्या कवितेतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर देवेंद्र फडवणीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी राज्या सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारच्या निर्णायावर नाराजी व्यक्त केली. वाईन विक्रीच्या निर्णायावर टीकेचा बाण सोडला. आज आनंदाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छोटं का होईना भाषण मांडलं. त्यांच भाषण आम्हाला ऐकायला मिळालं, असा खोचक टोलाही देवेंद्र फणडवीस यांनी लगावला.
तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो
ना नवे प्रकल्प, ना नवे योजना, सुरु प्रकल्प बंद, केवळ टीका, आरोप, टोमणे या पलिकडे काहीच नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विं दा करंदीकर यांची कविता सादर केली. याशिवाय फडणवीसांनी कवि पी एल बामनिया यांची कविता सादर केली. तुम चाहो तबेलो को बाजार कह दो, तुम चाहो पतझडो को बहार कह दो। तुम्हारा ही राज है अभी यहाँ पर, तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो। असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
सोन्याचं अंड देणारी कोंबडी
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित कला. देशातील सर्वाधिक मुंबई महापालिका श्रीमंत आहे. मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्ट्राचार आहे. हे पालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. सफाई कामगिरी करणाऱ्यांनाही लुटण्याचं काम सुरु आहे. आपण मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचं काम केले आहे. कोरोना काळात काढलेल्या सर्व कंत्राटामध्ये घोटाळे झाले आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत अनेक मोठ्या कंपन्या असताना आपल्याच नातेवाईकांच्या कंपनी स्थापन करुन कामं देण्यात आली. अनेक ठिकाणी कटपेस्ट करण्यांत आलंय अनेक चुका आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.
मविआ म्हणजे खाऊंगा भी, खिलाऊँगा भी और खानेवालों की रक्षा भी करुंगा; अमृता फडणवीसांची टीका
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या स्वतंत्र मतांसाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक केंद्रीय यंत्रणांचे छापे मंत्र्यांच्या, तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर पडत आहेत. राज्यातील या वातावरणावर त्यांनी आपलं मत मांडलं आहे. महाविकास आघाडी म्हणजे खाऊंगा भी, खाने भी दूंगा और खानेवालो की रक्षा भी करुंगा, असं झाल्याची टीका त्यांनी केली आहे. कोणत्याही द्वेषापोटी कारवाई होत नाहीये. महाराष्ट्रात प्रगतीचं राजकारण व्हावं, भ्रष्टाचार बंद व्हावा, असंही त्यांनी म्हटलंय.