मुंबई : बॉलीवूडची क्वीन असं स्वत:ला म्हणवणाऱ्या कंगनाची सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणानं चर्चा होत असते. राजकीय पुढा-यांसह तिने बॉलीवूडमधील अनेकांशी पंगा घेतला आहे. सध्या तिनं प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याशी वाद सुरु केला आहे. तो इतका टोकाला गेला ही थेट आता त्याची कोर्टात सुनावणी आहे. कोर्टानं दोन वेळा समन्स पाठवुनही कंगना हजर न राहिल्यानं अखेर कोर्टाला कडक शब्दांत कंगनाला सांगावं लागलं. त्यानंतर कंगना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहिली. मात्र कोर्टानं कंगनाला चांगलचं सुनावलं आहे. कोर्ट काय म्हणालं हे आपण जाणून घेणार आहोत. बॉलीवूडमधील सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री असणाऱ्या कंगनावर वेगवेगळ्या वक्तव्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानीची याचिका कोर्टात दाखल केली आहे. त्यानंतर कंगनाची डोकेदुखी काही थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. अखेर मुंबईतील एका कोर्टानं कंगनाला याप्रकरणी चांगलचं झापलं आहे. सत्र न्यायाधीश आर आर खान यांनी कंगनाला तू सेलिब्रेटी असशील मात्र एका प्रकरणात आरोपीही आहेस हे विसरता कामा नये. असे म्हणून कोर्टाचा आदर राखण्यास सांगितलं आहे. कंगनानं अख्तर यांच्याविरोधात जी याचिका दाखल केली होती ती याचिका कोर्टानं रद्द केली आहे. त्यावर सुनावणी करताना खान म्हणाले, ही गोष्ट खरी आहे की, दोन वेळा आरोपी कंगनाला समन्स पाठविल्यानंतर त्या आता कोर्टासमोर हजर झाल्या आहेत.
या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान त्यांनी त्यांच्या सोयीनुसार काही अटी आणि शर्ती कोर्टाला सांगितल्या आहेत. मात्र त्यांना देखील कोर्टाचे नियम आणि त्याच्या प्रक्रिकेचा आदर हा करावाच लागेल. कंगना या प्रसिद्ध सेलिब्रेटी आहेत. यात शंका नाही. मात्र त्याबरोबर त्यांनी आपण एका प्रकरणात आरोपीही आहोत हे विसरु नये. दरम्यान, कंगनानं आपल्याला या मानहानी प्रकरणाच्या याचिका सुनावणी दरम्यान सुट मिळावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती. मात्र ती याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 एप्रिलला होणार आहे.