Tuesday, April 22, 2025
Homeमहत्वाची बातमीआणखी सहा घोटाळे समोर येणार

आणखी सहा घोटाळे समोर येणार

किरीट सोमय्यांचा निशाणा आता थेट आदित्य ठाकरेंवर!

मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले आहेत. किरीट सोमय्या यांनी ईडीने केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने थेट ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. सगळी प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोप उडणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले.

ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची सुमारे 6 कोटींची मालमत्ता जप्त केली. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर कारवाईने केल्याने मोठी खळबळ उडाली होती. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरे कुटुंबावर आरोप करताना म्हटले की, ठाकरे कुटुंबीय आणि अन्वय नाईक यांच्या जमिनी व्यवहाराबाबत माहिती दिली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. आता ईडीच्या कारवाईबाबत तरी बोलतील का, असाही सवाल त्यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी म्हटले की, आदित्यने 2014 मध्ये आई रश्मी ठाकरे सोबत कोमो स्टॉक अॅण्ड प्रॉपर्टीज ही कंपनी स्थापन केली. त्यानंतर पाच वर्षानंतर आदित्य यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. आता ही कंपनी देशातील मोठा हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालकीची झाली आहे. उद्धव यांनी याबाबत काहीही भाष्य केले नाही. आदित्य श्रीधर आणि रश्मी यांच्यात कौटुंबिक संबंधासोबत आर्थिक संबंध आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावे अशीही मागणी सोमय्या यांनी केली. शेल कंपन्याच्या माध्यमातून मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबाचा संबंध काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, मनी लाँड्रिंग केली आहे का, या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री ठाकरे यांनी देण्याची मागणी सोमय्या यांनी केली.

आगामी काही दिवसांत आणखी सहा छोटे मोठे घोटाळे बाहेर येणार असून तपास यंत्रणांची कारवाई होणार असल्याचे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले. एवढा पैसा कुठून आला, महापालिकेच्या कंत्राटदारांकडून आले की दोन वर्षाच्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यातून पैसे जमा झाले याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव यांनी देण्याची मागणी देखील त्यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -