मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. रुग्णसंख्येने तब्बल 47 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 47,46,93,807 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे 61,22,433 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाने चिमुकल्यांना देखील आपल्या जाळ्यात ओढलं आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. अमेरिकेत गेल्या महिन्याभरात जवळपास 2 लाख 70 हजार लहान मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहेत.
‘अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स’ आणि ‘चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशन’च्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
‘सिन्हुआ’ वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, देशात गेल्या दोन वर्षांच्या काळात जवळपास 1.28 कोटी मुलं कोरोना संक्रमित आढळली आहेत. रिपोर्टनुसार, 19 टक्के मुलं करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
गेल्या चार आठवड्यांत जवळपास 2,70,000 कोरोना संक्रमित लहानग्यांची नोंद करण्यात आली आहे. 17 मार्च रोजी समाप्त झालेल्या गेल्या आठवड्यात एकूण 31,991 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती.
सप्टेंबर 2021 च्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत 77 लाखांहून अधिक लहान मुलं कोरोना संक्रमित आढळून आलीत. दीर्घकालीन प्रभावांचं आकलन करण्यासाठी गंभीरतेनं आणखीन डाटा गोळा करण्याची तत्काळ गरज असल्याचं एएपीननं म्हटलं आहे.
चीनमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या शनिवारी चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात दोन कोरोना मृत्युंची नोंद करण्यात आली. जानेवारी 2021 नंतर पहिल्यांदाच या दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारतात लहान मुलांना संसर्ग होऊ नये म्हणून काही काळ शाळा बंद होत्या, कोरोना महामारीत शाळा बंद राहिल्याने मुलांच्या शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. ऑनलाईन वर्ग सुरू असले तरी त्याचा सकारात्मक परिणाम कमी होता.
एका नवीन सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की महामारीच्या काळात मुलांच्या वाचन आणि लिहिण्याच्या क्षमतेत कमालीची घट झाली आहे. नॅशनल कोलेशन ऑन एज्युकेशन इमर्जन्सी या संस्थेने हे सर्वेक्षण तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन दक्षिणेकडील राज्यांमध्ये केले होते.
सर्वेक्षणात, 70 ते 80 टक्के पालकांनी कबूल केले की त्यांच्या मुलांच्या वाचन आणि लिहिण्याच्या क्षमतेवर महामारीच्या काळात परिणाम झाला आहे. ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत 500 कुटुंबांचा समावेश करून हे सर्वेक्षण करण्यात आले.
काही पालकांचे म्हणणे आहे की लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या सवयींमध्ये खूप बदल झाला आहे. मुलांमध्ये एकाग्रता कमी होणे, मोबाईलचे व्यसन, शिस्तीचा अभाव, अभ्यासात रस नसणे, टीव्ही पाहण्याची सवय, मानसिक ताण, खाण्याच्या सवयीतील बदल, एकटेपणा या समस्या दिसून येत आहेत.
आपल्या लहान मुलांनीही स्वच्छतेकडे लक्ष देणे सोडून दिल्याचे अनेक पालकांच्या निदर्शनास आले आहे. लॉकडाऊन दरम्यान कर्नाटकातील सरकारी शाळांमधील दोन तृतीयांशपेक्षा कमी विद्यार्थ्यांकडे सर्व पाठ्यपुस्तके होती.