मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ब-याच गोष्टी बाहेर काढणार असून नंदकिशोर चतुर्वेदी आणि मुख्यमंत्री ठाकरेंचे संबंध काय आहेत असा सवाल भाजपाचे किरीट सोमय्या यांनी केला आहे. आज मुंबईत ते बोलत होते. यावेळी विविध कारणांवरून सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबियावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात आता हवाला ऑपरेटरची एंट्री झाल्याने आता मुख्यमंत्र्यांची रात्रीची झोपही उडणार का अशा चर्चांना उधणा आलं आहे.
यावेळी सोमय्या म्हणाले, पुष्पक ग्रुपच्या संपत्तीप्रकरणी दीड वर्षापासून पाठपुरावा केला आहे. या संदर्भात ईडीला वेळोवेळी वेगळी माहिती दिली आहे. उद्धव ठाकरेंचे नंदकिशोर चतुर्वेदींशी काय संबंध आहेत. त्यांनी 19 बंगले लपवण्याचा प्रयत्न का केला आहे. या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरेंची झोप उडणार असेही ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले, मी याआधी असेच प्रश्न विचारले होते. अन्वय नाईक आणि ठाकरेंचे संबंध काय आहेत. मुख्यमंत्री ठाकरे आणि हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदींचे संबंध काय आहेत. १९ बंगले लपवण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केला. परंतु शेवटी खरं बाहेर आलं आहे. २०१९ ला रश्मी ठाकरे म्हणतात की १९ बंगले माझे आहेत आणि आता २०२२ ला मात्र तिथे बंगलेच नव्हते असे विधान करतात, याचा अर्थ काय समजायचा. श्रीधर पाटणकर आणि हवाला ऑपरेटर्सच्या संबंधांवर उद्धव ठाकरे बोलणार आहेत का?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र घोटाळे मुक्त करणार आहे. पुढील काही दिवसांत हवाला ऑपरेटर्सचा मोठा पर्दाफाश करणार आहे. उदयशंकर हेही हवाला किंग आहेत. त्यांनी यशवंत जाधवांसाठी हवाला किंग म्हणून काम पाहिलं आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी आणखी काही पाच ते सहा छोटे मोठे घोटाळे बाहेर काढणार आहे. त्यामुळे पाटणकरांशी रश्मी आणि आदित्य ठाकरे यांचे काय व्यवहार झाले आहेत हे सांगावे. पाटणकरांशी झालेल्या व्यवहारासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे बोलणार का, असेही ते म्हणाले आहेत.