हैदराबाद : तेलंगणातील हैदराबादमध्ये बुधवारी आगीची मोठी घटना समोर आली आहे. हैदराबादमधील भोईगुडा येथे एका भंगार दुकानाला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. या आगीत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
हैदराबादेतील भोईगुडा परिसरातील भंगार दुकानाला बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये झोपेत असलेल्या ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर एकाला स्वतःचा जीव वाचविण्यात यश आलं. पण तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व कामगार बिहार येथील असल्याची माहिती मिळतेय. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास सुरू असल्याचे गांधी नगरचे पोलिस अधिकारी मोहन राव यांनी सांगितले.
आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच तपशील सादर केला जाईल, असं हैदराबादचे जिल्हाधिकारी एल. शर्मन यांनी सांगितले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सिकंदराबादमधील भोईगुडा भंगार दुकानाला लागलेल्या आगीत बिहारमधील कामगारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आणि मुख्य सचिवांना या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे मृतदेह बिहारला पाठविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.